हिमाचलमधील छोटे वेरूळ – मसरूर


महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ या जागतिक लोकप्रियतेच्या पर्यटनस्थळी खडकातून कोरलेले काव्य म्हणजे लेणी पाहण्यासाठी लक्षावधी पर्यटक दर वर्षी हजेरी लावत असतात. निसर्गसुंदर हिचामलमध्येही असेच छोटे वेरूळ म्हणता येईल असे स्थळ आहे. मसरूर मंदिर समुह असे त्याचे नांव असून येथेही महाप्रचंड कातळातून मंदिरांचा समूह कोरला गेला आहे. ही लेणी ७ व्या किंवा ८ व्या शतकातील असून त्यांना जागतिक वारसाचा दर्जा नुकताच दिला गेला आहे. ही लेणी फारशी प्रसिद्ध नाहीत मात्र ती आवर्जून पाहण्यासारखी आहेत.


कांगडा घाटीपासून जवळ असलेल्या या ठिकाणी २५०० फूट उंचीच्या प्रचंड खडकातून मंदिरे कोरली गेली आहेत. आर्य शैलीतील ही मंदिरे असून त्यांना हिमालयातील पिरामिड म्हणूनही ओळखले जाते. या परिसरात पोहोचताच आपण ६ व्या किंवा ८ शतकात आलो आहोत असा भास होतो. पूर्वी या ठिकाणी शिवमंदिर होते असे सांगितले जाते मात्र आता यातील सर्वात मोठ्या मंदिरात राम, लक्ष्मण व सीता यांच्या पाषाणातून कोरलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. येथील वास्तूकला अतिशय सुंदर असून या मंदिर उभारणीत कोठेही जोडकाम अथवा सिमेंटसारख्या पदार्थाचा वापर केला गेलेला नाही. गर्भगृह, मूर्ती, पायर्‍या, दरवाजे सर्व दगडातूनच कोरले गेले आहे.

मंदिरासमोर मसरूर सरोवर असून यात मंदिराचे प्रतिबिंब पडते. सरोवरामुळे मंदिरांच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.

Leave a Comment