एक दुजे के लिये कपल्ससाठी बनलेल्या खास वस्तू


जगभरात अनेक कपल्स जन्मजन्मांतरासाठी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेत असतात. या शपथा किती खर्‍या ठरतात कोण जाणे पण सुरवातीला तरी एक क्षणासाठीही वेगळे होण्याची त्यांची तयारी नसते हेही तितकेच खरे. मग या मानसिकतेचा फायदा घेऊन खास वस्तू बनवून त्यांचे मार्केर्टिंग करण्याचा व त्यातून पैसा मिळविण्याचा प्रयत्न उत्पादक कंपन्या करतात व त्यातून अनेकदा विचित्र किंवा ऑड वाटणार्‍या वस्तूही बाजारात येतात. अशाच कांही वस्तूंची माहिती माझा पेपरच्या वाचकांसाठी


असल्या वस्तू अनेकदा हॉलीवूड पटांची देणगी बनल्या आहेत. डबल बाथटब या त्यातलाच एक प्रकार. यात दोघांनाही एकाच वेळी म्हटले तर एकत्र व म्हटले तर स्वतंत्र अंघोळ करण्यासाठी जोडलेले बाथटब तयार केले गेले अ्राहेत. डबल टब असे त्याचे नांव आहे. लॉंग डिस्टन्स पिलो टॉक हे उपकरण हा आणखी एक प्रकार. यात कपल्साठी पिलोमध्ये एक रिसिव्हर असतो. त्यात पार्टनरच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात यामुळे दूर असलात तरी तुम्ही एकमेकांजवळ असल्याचे समाधान मिळू शकते.


हातात हात घालून फिरण्याकडेही प्रेमी जोडप्यांचा अनेकदा कल असतो. थंड प्रदेशात हातात हात घालून फिरायचे तर किमान हातमोजे हवेत म्हणजे हातात हात मिळविण्यावर बंधन आलेच की. त्यावर उपाय म्हणून जोडहातमोजे बनविले गेले असून हे हातमोजे एकाचवेळी दोघांना घालता येतात. तसेच दोघांसाठी पावसाळ्यात वापरता येईल अशी दोन दांडे असलेली छत्रीही बनविली गेली आहे.


सर्वात कळस आहे तो नियाग्रा कंपनीने बनविलेले लव्ह टॉयलेट. टू डा लू टॉयलेट.म्हणजे अगदी एक क्षणासाठीही वेगळे राहायला नको असणार्‍यांची सोय. विशेष म्हणजे ९० हजार रूपये किमतीची ही टॉयलेट भांडी अतोनात लोकप्रियही झाली होती. कंपनीने त्याचा व्हिडीओ तयार केला होता व तोही लाखो लोकांनी पाहिला होता. आता बोला!

Leave a Comment