सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कंडोमच्या फक्त ‘त्या’ जाहिरातींना बंदी


नवी दिल्ली : केंद्र सरकारने सकाळी ६ ते रात्री दहा वाजताच्या दरम्यान कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर आणलेल्या बंदीवरुन एक पाऊल मागे घेतले असून माहिती आणि प्रसारण विभागाने थेट लैंगिक दृश्य दाखवणाऱ्या कंडोमच्या जाहिराती दिवसा प्रक्षेपित करण्यास बंदी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच कंडोमच्या जाहिराती दाखवाव्यात, असे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले होते. एका विशिष्ट वयोगटातील व्यक्तींसाठी कंडोमच्या या जाहिराती आहेत, त्या लहान मुलांसाठी निरुपयोगी असल्यामुळे विशिष्ट वेळेतच दाखवण्याची सूचना केंद्राने दिली होती. हा आदेश एखाद्या कंडोम ब्रँडच्या प्रमोशनसाठी लैंगिकदृष्ट्या उघड दृश्य दाखवणाऱ्या जाहिरातींना लागू होता.

महिलांना लैंगिक उपभोगाची वस्तू म्हणून ज्या जाहिरातींतून दाखवले जात नाही, पण नागरिकांना सुरक्षित शारीरिक संबंधाची माहिती दिली जाते, त्या जाहिराती सकाळच्या वेळेत दाखवण्यास आक्षेप नसल्याचे सांगण्यात आले. केंद्राने ११ डिसेंबरला सर्व टीव्ही वाहिन्यांना सकाळी ६ ते रात्री १० वाजताच्या दरम्यान कंडोमच्या जाहिराती प्रक्षेपित न करण्याची नोटीस जारी केली होती. सर्वसामान्यांमधून या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सोशल मीडियावरही यावर ट्रोलिंग सुरु होते.

एका एनजीओने केंद्राच्या निर्णयाविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही नोटीस जारी करण्यामागील कारणं एनजीओने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला विचारली होती.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment