आयफोनचे जुने मॉडेल अधिक काळ चालावेत, यासाठी त्यांना जाणूनबुजून मंद करण्याची कबुली जगप्रसिद्ध कंपनी ‘अॅपल’ने दिली आहे. मात्र या कबुलीवरून कंपनीच्या विरोधात आता अमेरिकेत खटला दाखल झाला आहे.
आयफोन स्लो केल्याबद्दल ‘अॅपल’वर खटला
लॉस एंजेल्सचे रहिवासी असलेले स्टेफान बोगडॅनोव्हिच आणि डाकोटा स्पिआस या दोघांनी हा खटला दाखल केला आहे. आमचे मोबाईल मंद करण्यासाठी ‘अॅपल’ने आमची कधीही संमती घेतली नव्हती, अशी तक्रार त्यांनी केली आहे. या दोघांकडे आयफोन 7 तसेच अन्य अनेक मॉडेल आहेत. मात्र कंपनीने जाणूनबुजून या फोनचा वेग कमी केल्यामुळे आमच्या मोबाईल वापरात अडथळे आले, असे त्यांनी म्हटले आहे.
फोन चालविण्यासाठी आवश्यक पॉवर नसलेल्या नव्या बॅटऱ्या नसतील, तर फोनचा कमाल वापर होण्यासाठी ते धीमेपणाने चालावेत, अशी सोय केल्याचे ‘अॅपल’ने बुधवारी मान्य केले होते.
‘अॅपल’चे नवीन मॉडेल बाजारात येताच जुने मॉडेल मंदगतीने चालतात, असे आमच्या लक्षात आल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात आमचे आर्थिक तसेच अन्य नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.