निराश करणार नाही टायगर


अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’चा सीक्वेल आहे. अॅक्शनने पुरेपूर असा हा चित्रपट आहे. सलमान खान आणि अली अब्बास जफरने याआधी ‘सुल्तान’मध्ये एकत्र काम केले होते. या जोडीचा ‘सुल्तान’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

एका ओळीत ‘टायगर जिंदा है’बद्दल सांगायचे झाल्यास अॅक्शन पॅक आणि देशभक्तीवर आधारीत हा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा ४० नर्सेसना वाचवण्याच्या मिशननने सुरु होते. टायगर (सलमान खान) आणि जोया (कतरीना कैफ) या मिशनवर असतात. या ४० नर्सेसमध्ये २५ भारतीय आणि १५ पाकिस्तानी नर्स असतात. इराकमध्ये आयएसआयने या नर्सेसचे अपहरण केलेले असते. इराकवर अमेरिका बॉम्ब वर्षाव करण्याच्या तयारीत असते. भारताला त्यांनी नर्सेसना सोडवण्यासाठी ७ दिवसांचा अवधी दिलेला असतो. भारताने या 7 दिवसांत जर नर्सेसना सोडवले नाही तर अमेरिका बॉम्ब वर्षाव करणार असते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नर्सेस अडकलेल्या असल्याने दोन्ही देश संयुक्त कारवाई करतात. भारताकडून या कामासाठी टायगरची निवड होते. तर पाकिस्तानमधून जोयाची निवड होते.

टायगर आणि जोया अॅक्शन आणि ड्रामाने भरपुर असलेल्या या चित्रपटात आयएसआयच्या अड्ड्यापर्यंत पोहोचतात का, आणि ते नर्सेसना सोडवण्यात यशस्वी होतात की स्वतः अडकतात या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी तुम्हाला थिएटरच गाठावे लागेल. टायगर आणि जोयाला या मिशनमध्ये कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो, ते त्याला कसे तोंड देतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा लागेल.

‘टायगर जिंदा है’चे अली अब्बास जफरने कमालीचे दिग्दर्शन केले आहे. सलमान आणि कतरीनाने केलेले अॅक्शन सीन्स डोळ्यांचे पारणे फेडणारे असून बर्फांच्या डोंगरावरील अॅक्शन आणि जंगली प्राण्यांसोबत सलमानचे सीन्स लाजवाब आहेत. त्यासोबतच चित्रपटातील सलमानचे डायलॉग्ज देखील छान जमून आले आहेत. चित्रपट फिल्म थोडा लांबल्या सारखे वाटते, त्याची लांबी आणखी कमी करता आली असती. पण एकंदर संपूर्ण चित्रपट हा निराश करणार नाही एवढे नक्की…

सलमान खान आपल्या जबरदस्त अॅक्शनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात सलमानचा अभिनय लाजवाब झाला आहे. सलमान चित्रपटामध्ये असताना कतरीना देखील स्वतःची उपस्थिती जाणवून देते. दोघांनीही जबरदस्त अॅक्शन सीन्स केले आहेत. चित्रपटामधील इतर कलाकारांनीही आपापली भूमिका योग्य निभावली आहे. इराणी अॅक्टर सज्जाद डेलाफ्रूजनेही व्हिलनच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.

चित्रपटाचे संगीत चांगले आहे. गाण्यांची कोरिओग्राफी चांगली झाली आहे. बॅकग्राऊंड म्यूझिकही प्रत्येक सीनला योग्य असेच आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘स्वैग से स्वागत’ आणि ‘दिल दिलान गल्ला’ हिट झाले होते. तुम्ही जर देशभक्तीचा संदेश आणि अॅक्शन चित्रपटाचे चाहते असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे.