ब्रॉडबँड डाउनलोड वेगाच्या सुधारणेत भारताचे स्थान सर्वात वर


वर्ष सरत असताना भारतातील इंटरनेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. ब्रॉडबँड इंटरनेट डाऊनलोड वेगाच्या सुधारणेत भारताने यंदाच्या वर्षी प्रथम स्थान पटकावले असून सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये मोबाईल डाटा वेगाच्या सुधारणेत भारताला दुसरे स्थान मिळाले आहे.

इंटरनेटचा जागतिक पातळीवर वेग मोजणाऱ्या ओकला या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निर्देशांकात ही माहिती देण्यात आली आहे. भारताने चीन व अमेरिकेला या बाबतीत मागे टाकले आहे.

‘भारतात या कालावधीत ब्रॉडबँड स्पीडमध्ये 76.9 टक्के सुधारणा झाली आहे. या बाबतीत चीन दुसऱ्या आणि अमेरिका तिसऱ्या स्थानी होती. मोबाईल डाटा डाऊनलोड वेगातही देशात 42.4 टक्के सुधारणा झाली. अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये मोबाईल डाटा वेगाच्या सुधारणेत मात्र पाकिस्तानने 56 टक्के अंक मिळवून बाजी मारली आहे’ असे ओकलाने म्हटले आहे.

‘जागतिक पातळीवर ब्रॉडबँड इंटरनेटच्या वेगात 30 टक्क्यांनी, मोबाईल इंटरनेट डाऊनलोड वेगात 30.1 टक्क्यांनी आणि मोबाईल इंटरनेट अपलोड वेगात 38.9 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे,’ असे अहवालात म्हटले आहे.

‘भारतात मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेटच्या वेगात गेल्या काही वर्षांमध्ये खूप सुधारणा झाली आहे. मात्र इंटरनेटचा वेग अधिक असलेल्या देशांच्या रांगेत येण्यासाठी भारताला खूप काळ लागेल,’ असे कंपनीचे सहसंस्थापक आणि जनरल मॅनेजर डॅग सटल्स यांनी सांगितले.

Leave a Comment