दिवसा इंजिनियर, रात्री ड्रायव्हर – हैद्राबादच्या आयटी तंत्रज्ञांची अवस्था


माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैद्राबादमध्ये संगणक अभियंत्यांना ईएमआयची समस्या भेडसावत आहे. मासिक हप्ते फेडण्यासाठी या अभियंत्यांना दिवसा तंत्रज्ञांचे तर रात्री कॅब चालविण्याचे काम करावे लागत आहे.

हैद्राबादमधील आयटी सिटीतील अनेक युवा आयटी तंत्रज्ञांचा हा नवा अवतार आहे. येथील आयटी प्रोफेशनल्स युवांनी मोठ्या संख्येने स्वतःच्या कार विकत घेतल्या आहेत. या कारच्या हप्त्यांचा बोजा त्यांच्या खिशावर पडत आहे. हेच ओझे कमी करण्यासाठी ते कॅब अॅग्रेगेटर बनत आहेत. स्थानिक माहितगारांच्या मते, सुमारे 80 टक्के कॅबचालक पार्टटाईम खासगी कार चालवतात.

विशेष म्हणजे या युवकांना या कामाबाबत काही अडचण वाटत नाही. शिवा नावाच्या संगणक अभियंत्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले, की तो दररोज रात्री 3 ते 5 तास कॅब चालवतो. त्यातून त्याला दर महिन्याला 20 हजार रुपयांची कमाई होते. त्याच्या कारचा हप्ता 11 हजार रुपयांचा आहे.

अशा प्रकारचा ट्रेंड चालू असल्याची गोष्ट ओलाच्या प्रवक्त्यानेही मान्य केली. मात्र स्वतःची गाडी कॅब म्हणून चालविणाऱ्यांचा अधिकृत आकडा उपलब्ध नाही, मात्र कॅबची संख्या वाढली असल्याचे या प्रवक्त्याने मान्य केले.