येत्या १ फेब्रुवारीला सादर केल्या जाणार्या अर्थसंकल्पात यंदा करदात्यांसाठी आयकरावरील सवलत ३ लाखांवर नेली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प आहे. कारण फेब्रुवारी २०१९ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल व त्यानंतर सत्तेवर येणारे नवे सरकार संपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. अर्थात अंतरिम अर्थसंकल्पात करात बदल शक्य नसल्याने हा बदल यंदाच केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
आयकर सवलत ३ लाखांवर जाणार?
वित्त मंत्रालयाने अर्थतज्ञांकडून मागविलेल्या शिफारसींमध्ये आयकर सवलतीबाबत तीन पर्याय दिले गेले आहेत. त्यात आयकर सवलत मर्यादा ३ लाखांवर नेणे, ६० ते ८० वयोगटासाठी ती साडेतीन लाख तर ८० च्या वरील वयासाठी ती साडेपाच लाख करणे असा पहिला पर्याय आहे. दुसर्या पर्यायात सध्याची मर्यादा पावणेतीन ते तीन लाखांवर नेऊन ६० ते ८० वयोगटासाठी ती ३ लाख ३० हजार ते साडेतीन लाख व ८० च्या वर ती साडेपाच लाखांवर नेण्यासंबंधी शिफारसी केल्या गेल्या आहेत. तिसर्या पर्यायात पहिली मर्यादा ३ लाख, सिनियर सिटीझन्ससाठी चार लाख तर सुपरसिनियर्ससाठी ६ लाख असावी अशी शिफारस केली गेली आहे.
पैकी वित्त मंत्रालयाने आयकर सवलतीत ५० हजारांनी वाढ करण्याच्या शिफारसींना सहमती दर्शविली असल्याचे सांगितले जात आहे.