आता रेडिओ, वर्तमानपत्रातून झळकणार थुकरटांची नाव


नवी दिल्ली – इंदूरच्या महापौरांनी रस्त्यावर थुंकून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर जरब बसवण्याकरिता एक नवा नियम जारी करण्याचे ठरवले असल्यामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून यापुढे दंड तर आकारण्यात येईलच पण, रेडिओ आणि वर्तमान पत्रांतूनही अशा लोकांची नावे यापुढे जाहीर करण्यात येणार असल्याचे इंदूरच्या महापौर मालिनी लक्ष्मण सिंग गौड यांनी एक वृत्त संस्थेला सांगितले आहे.

देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूर शहराला स्थान मिळाले असल्यामुळे भविष्यातही स्वच्छ शहराचा दर्जा कायम राहावा यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पान, गुटखा खाऊन जागोजागी पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर यापुढे कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्याकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे गौड यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांची नावेही स्थानिक रेडिओद्वारे जगजाहीर करण्यात येतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment