मुंबईतल्या सिक्रेट मार्केटमध्ये फेरी मारलीत?


स्वस्तात मस्त किंवा ब्रँडेड वस्तू अगदी स्वस्तात अशी जाहिरात वाचून संबंधित जागी गर्दी करणारे ग्राहक आपण नित्य पाहतो. त्यातच आता महाराष्ट्र सरकारने राज्यभरात दुकाने व रेस्टॉरंट २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी नुकतीच दिली आहे. मात्र ही परवानगी नव्हती तेव्हाही रस्ते का माल सस्तेमे देणारा एक बाजार मुंबईत गेली अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ६७ वर्षे भरतो आहे. या बाजाराचे नांव आहे सिक्रेट मार्केट

या बाजाराचे वैशिष्ठ म्हणजे हा बाजार फक्त रात्रीतच भरतो. १९५० पासून असा बाजार भरत आहे. पूर्वी तो फक्त शुक्रवारी असायचा आता तो गरूवारीही भरतो. या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. मुंबईच्या कामाठीपुरा भागातील दीडलेन येथे हा बाजार भरतो. पूर्वी हा चोर बाजार म्हणून ओळखला जायचा पण आता या बाजारात ब्रँडेड वस्तूही मातीमोल भावात विकल्या जातात.या बाजाराची उलाढाल दिवसाला १५ ते २० कोटींच्या घरात असल्याचेही समजते. येथे येणारा माल मुंबईजवळच्या छोट्या कारखान्यांतून येतो तसाच चिनी बाजारातूनही येतो. सायंकाळी ४ वाजता भरणारा हा बाजार दुसरे दिवशी सकाळी ८ पर्यंत सुरू असतो.

मिडीया रिपोर्ट नुसार डिफेक्टिव्ह ब्रँडेड माल दुरूस्त करून येथे विकला जातो तसेच आसपासच्या छोट्या कारखान्यांतूनही येथे माल येतो. येथे खरेदीसाठी येणार्‍या व्यापार्‍यांची संख्याही मोठी आहे. नाईकेचे २०१४ एअरमॅक्स रनिंग शूज येथे ८ हजाराऐवजी १५०० रूपयांत मिळू शकतात तसेच कॅटचे ८ हजारांच्या वर किंमती असलेले लेदर शूज फक्त ८०० रूपयांत मिळतात. येथे पादत्राणांचा बाजार मोठा असला तरी जुनी मौल्यवान घड्याळे, अँटीक वस्तू, अँटिक कॅमेरे व दररोजच्या वापराच्या हजारो वस्तू येथे अगदी स्वस्तात खरेदी करता येतात. लहान शहरातील व्यावसायिकही येथे खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात तसेच मुंबईकरही येथे खरेदीसाठी गर्दी करत असतात.

Leave a Comment