अनलकी नंबर्सचे फॅड


आपण अंधविश्वास म्हणून अनेक गोष्टी झुगारून देण्याचा प्रयत्न करत असलो तरी अगदी सुधारलेल्या देशांतूनही अनेक प्रकारचे समज, भ्रम लोकांमध्ये असतात व लोक अगदी विश्वासाने ते पाळत असतात. कोणत्या गोष्टी अशुभ व कोणत्या शुभ हे कुणी ठरविले हे आपणास माहितीही नसते मात्र तरीही एखादा प्राणी, एखादी जागा, एखादी खगोलिय घटना, कांही आकडे, कांही अक्षरे अशुभ मानली जातात. अर्थात प्रत्येक ठिकाणी हे वेगवेगळे असू शकते. म्हणजे घुबड भारतात अशुभ मानले जाते मात्र ब्रिटनमध्ये ते शुभ मानतात. देशोदेशींच्या लोकांसाठी कोणते आकडे अशुभ मानले जातात हे पाहणेही मनोरंजक ठरेल.

पारंपारिक तरीही आधुनिकतेचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर करणार्‍या जपानमध्ये चार आकडा अशुभ मानला जातो. या नंबरशी संबंधित कोणतही काम तेथे केले जात नाही. त्यामुळेच जपानमध्ये चार मजली इमारती नाहीत. जपानी भाषेत या चार आकड्याचा उच्चार इंग्रजीतील डेथ म्हणजे मृत्यू या शब्दासारखा होतो त्यामुळे हा आकडा येथे निषिद्ध आहे. चीन व कोरियातही हा आकडा अनलकी मानला जातो.

भारतात बारा वाजणे व तीन तेरा वाजणे असे दोन वाक्प्रचार आहेत त्याचाही अर्थ वाईट घटणे, बोर्‍या वाजणे असा आहे. अरब देशात १९ आकडा अशुभ मानला जातो. येथील हॉटेलमध्ये १९ नंबरची रूम नसते. चीनमध्ये ९ नंबर अशुभ मानला जातो कारण एखाद्या माणसाला टॉर्चर केल्यानंतर त्याच्या तोंडातून जो आवाज येतो त्याचे साधर्म्य या आकड्याशी आहे. त्यामुळे हा आकडा कोणत्याही शुभकामात वापरला जात नाही.

१३ हा नंबर अनेक पाश्वात्य देशात अशुभ मानला जातो. ज्या दिवशी येशूला सुळावर चढविले त्याच्या आदल्या रात्री लास्ट सपरसाठी १३ जणांची उपस्थिती होती. इटलीमध्ये १७ आकडा अशुभ आहे कारण त्याचा लॅटिन भाषेत अर्थ आयुष्याची अखेर असा आहे. अफगाणिस्तानात ३९ आकडा अशुभ मानला जातो कारण हा नंबर वेश्या अथवा मेलेली गाय यांच्यासाठी वापरला जातो. त्यामुळे कारच्या नंबरमध्ये हा आकडा असेल तर लोक रस्ता बदलून दुसर्‍या रस्त्याने जाणे पसंत करतात.

Leave a Comment