आता राशीनुसार पर्यटनाची क्रेझ


भारतात बहुतेक सर्वजण दररोज राशीभविष्य वाचतात असा दावा केला जातो. वर्तमानपत्रात सर्वाधिक वाचला जाणारा कॉलम राशी भविष्याचा असतो. परदेशातही अनेक लोक आपल्या राशीत आज काय लिहून ठेवले आहे याचा आढावा घेत असतात. अर्थात परदेशातील भविष्य हे सूर्यराशीनुसार म्हणजे जन्म तारखांवरून असते तर भारतात ते चंद्र राशीनुसार म्हणजे जन्माच्यावेळी चंद्र ज्या राशीत त्यावरून वर्तविलेले असते.

आजकाल परदेशात राशीनुसार पर्यटनाची क्रेझ वाढत चालली असून आपल्या राशीनुसार जगातील कोणत्या भागाला आपण भेट द्यावी हे जाणून घेतले जात असल्याचे दिसून आले आहे.


आपल्या १२ राशी चार तत्वात विभागल्या गेलेल्या आहेत. पैकी अग्नीतत्त्वात मेष, सिंह व धनु या राशी येतात. या राशीचे लोक उर्जावान, चांगला ह्युमर सेन्स असलेले, आशावादी व साहसी मानले जातात. त्यामुळे या राशींच्या लोकांसाठी समुद्र किनारे तसेच अन्य रोमांचक ठिकाणचे पर्यंटन योग्य ठरते असे सांगितले जाते. त्यांच्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील पर्यटनाची शिफारस केली जात आहे.


कर्क, वृश्चिक व मीन या राशी जलतत्त्वाच्या मानल्या जातात. या राशींचे लोक संवेदनशील, भावनात्मक व कुटुंबासह, मित्रांसह मजा करणारे मानले जातात. या लोकांनी फ्रान्स व त्यातही पॅरिस चे पर्यटन करावे असा सल्ला दिला जात आहे तर वृषभ, कन्या व मकर या पृथ्वीतत्त्वाच्या राशी असून या राशीचे लोक कुशल व्यवहारी, महत्त्वाकांक्षी मानले जातात. त्यांनी अमेरिका त्यातही कॅलिफोनिर्यातील नापा दरीला भेट द्यावी. मिथुन, तूळ व कुंभ ही रास वायुतत्त्वाची मानली जाते. हे लोक साहसी, मनमिळावू असतात त्यांनी कॅनडातील दर्‍याखोर्‍यात भटकंती करावी असा सल्ला दिला जात आहे.

Leave a Comment