देशातील हनुमान, मकरध्वजाचे एकमेव मंदिर


देशातील एकही गांव असे नाही जेथे हनुमानाचे मंदिर नाही. मात्र हनुमानाचे त्याचा पुत्र मकरध्वज याच्यासह असलेले एकमेव मंदिर गुजराथेतील बेट द्वारका या प्रसिद्ध धार्मिक स्थळाजवळ आहे. हनुमान ब्रम्हचारी होते मात्र तरीही मकरध्वज त्यांचा मुलगा आहे. यामागे अशी कथा सांगितली जाते की लंकेत जेव्हा हनुमानाच्या शेपटीला आग लावली गेली तेव्हा त्याने लंका जाळून शेपूट समुद्रात विझविली. त्यावेळी त्याच्या घामाचा एक थेंब मगरीच्या पोटात गेला व त्यापासून मकरध्वजाचा जन्म झाला.

या मंदिराचे नांव दांडी हनुमान असे आहे. मंदिरात मकरध्वजाची मोठी व हनुमानाची छोटी अशा दोन मूर्ती आहेत. येथे दोघांच्याही हातात शस्त्र नाही. गुजराथीत दांडीचा अर्थ आनंदात आरामात असणे असा आहे. त्यामुळे येथे हनुमान व मकरध्वज यांच्या हातात शस्त्र नाही म्हणजेच ते आरामाच्या मूडमध्ये आहेत. मंदिर छोटेसे असून आत गुहेसारखा भाग आहे व त्यात या दोन्ही मूर्ती आहेत.


असेही सांगतात की हनुमानाची मूर्ती डावीकडे असून ती हळूहळू वाढते आहे. सध्या ही मूर्ती हनुमानाच्या मांड्यापर्यंतच दिसते. या उलट मकरध्वजाची मूर्ती हळूहळू पाताळात जात असून तिची उंची कमी होते आहे. जेव्हा ही मूर्ती पूर्ण पाताळात जाईल तेव्हा कलियुगाचा अंत होईल अशीही वदंता आहे. दसर्‍यादिवशी द्वारकाधीशाच्या मूर्तीला श्रीरामाचा पोशाख करून ती या मंदिरात पालखीतून आणली जाते. भाविकांची अशीही श्रद्धा आहे की या मंदिरातील पुजार्‍यांकडून सुपारी घेऊन ती घरी नेली व श्रीराम जयराम जयजय राम हा मंत्र सुपारी हातात धरून केला तर कोणत्याही व्याधी बर्‍या होतात व घरात सुखसमाधान नांदते.

Leave a Comment