आजही अनेक देशांची खजिन्यासाठी सोन्यालाच पसंती


गतवर्षात सोन्याने फक्त ४.२८ टक्के परतावा दिला आहे व गेल्या पाच वर्षात सोन्याच्या किंमती ११.७४ टक्के घटल्या आहेत तरीही जगभरातील अनेक देश आजही देशाच्या रिझर्व्ह खजिन्यासाठी सोन्यावरच भिस्त ठेवून असल्याचे दिसून आले आहे. एकच बाब याबाबत सकारात्मक आहे ती म्हणजे गेल्या सोळा वर्षात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

सर्वाधिक सोने साठे असलेला देश म्हणून अमेरिका नंबर वनवर असून त्यांच्या साठ्यात ९१३३.५ टन सोने आहे. हा साठा म्हणजे त्याच्या परकीय चलनाचा ७४.९ टक्के हिस्सा आहे. अमेरिकेपाठोपाठ दोन नंबरवर जर्मनी असून त्यांचा साठा ३३७३ टन आहे तर तीन नंबरवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे. त्याचा सोने साठा २८१४ टन आहे. १८९ देश नाणेनिधीचे सदस्य असून त्यांनी त्यांचा २५ टक्के वाटा सोन्याच्या रूपानेच दिलेला आहे. हा संघ १९४४ मध्ये स्थापन झालेला आहे. या यादीत चार नंबरवर इटली आहे त्यांचा सोने साठा २४५१ टन आहे. पाच नंबरवर फ्रान्स २४३५.९ टन, सहा नंबरवर चीन १८४२.६ टन, सात नंबरवर रशिया १८०१.२ टन, आठ नंबरवर स्वित्झर्लंड १०४० टन, नऊ नंबरवर जपान ७६५.२ टन तर दहा नंबरवर नेदरर्लंड ६१२.५ टन अशी क्रमवारी आहे.

ज्या भारतात सोन्याची भूक प्रचंड मोठी आहे त्याचा नंबर या यादीत ११ वा असून भारत सरकारकडे ५५७.८ टन सोने आहे. मात्र प्रत्येक भारतीयाच्या घरांत असलेल्या सोन्याचे प्रमाण प्रचंड असून घराघरात तसेच मंदिरांकडे असलेल्या सोन्याचा साठा २० हजार टनांवर असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Comment