आग्रा एसएसपी ऑफिसात वानरराज


आपल्याकडे काट्याने काटा काढणे अशी एक म्हण आहे. त्याचा प्रत्यय आग्रा येथील एसएसपी ऑफिसमध्ये येऊ लागला आहे. या ऑफिसमध्ये चक्क एका काळतोंड्या वानराची नेमणूक केली गेली आहे. आग्रा येथील एसएसपी अमित पाठक यांनी एक काळतोंडे वानर कार्यालयात तैनात काढण्याचे आदेश जारी केले होते.

असे समजते की या कार्यालयात माकडांनी हैदोस घातला आहे. कुठल्याच विभागाचे काम त्यामुळे नीट होत नाही. ही माकडे कार्यालयात घुसून सामानाचे नुकसान करतातच पण फायलीही फाडून टाकतात. अनेक उपायांनीही हा त्रास कमी होत नव्हता. कर्मचार्‍यांच्या अंगावर ही माकडे धावून जाण्याइतकी धीट बनली होती. अखेर पाठक यांनी एक वानर या कामी तैनात करण्याचा निर्णय घेतला. या वानराला माकडांना पिटाळून लावण्याचे रितसर प्रशिक्षण दिले गेले असून या वानराला पाहताच माकडे आपोआपच पळ काढत असल्याचे समजते. या वानराला किती पगार दिला जाणार याचा खुलासा झालेला नाही.

यापूर्वी सर्च इंजिन गुगलनेही बकर्‍या कामावर ठेवल्याची बातमी आली होती. कार्यालयाच्या परिसरातील गवत खाण्याच्या कामी २०० बकर्‍या तैनात करण्यात आल्या असून त्यांना रितसर पगार दिला जात आहे. गवत कापण्याच्या मशीनचा आवाज व धूर याचा त्रास कर्मचार्‍यांना होऊ लागल्यानंतर या कामी बकर्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment