परीक्षा इंग्रजीची आणि पदवी मात्र सायकोलॉजीची !


बिहार राज्यातील मुजफ्फरपूर मधील भीमराव अम्बेडकर बिहार विद्यापीठाच्या मोहम्मद ताब्रेज या विद्यार्थ्याने बी ए पदवी परीक्षेचा पहिला भाग पूर्ण केला आहे. त्याची गुणपत्रिका, तो ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचे दर्शविते आहे. पण तरी ही मोहम्मद ताब्रेज या विद्यार्थ्याची अवस्था मोठी बिकट झाली आहे. ही गुणपत्रिका पाहिल्यापासून ह्या विद्यार्थ्याची तहान भूक हरपली आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नाही, आणि पुढे काय करायचे हे ही त्याला समजत नाही. कारण या विद्यार्थ्याने परीक्षा दिली इंग्रजी विषयाची आणि त्याची गुणपत्रिका मात्र त्याने मानसशास्त्र विषयाची पदवी मिळविली असल्याचे सांगते. यामध्ये धक्कादायक गोष्ट ही, की मोहम्मद ताब्रेज याने मानसशास्त्र हा विषय पदवी अभ्यासक्रमाकरिता निवडलाच नव्हता.

ह्या घटनेने बिहार मधील शिक्षण क्षेत्रामधील सतत होणारे घोटाळे पुन्हा एकदा समोर आले आहेत. मोहम्मद ताब्रेज या विद्यार्थ्याने इंग्लिश ऑनर्स या विषयाकरिता परीक्षा दिली असून, भूगोल आणि इतिहास असे त्याचे अतिरिक्त विषय होते. पण गुणपत्रिका आली तेव्हा त्यामध्ये त्याचे गुण इंग्रजी विषयातील नसून, मानसशास्त्र या विषयातील होते. इतकेच नाही, तर मानसशास्त्र विषयाच्या ‘ प्रॅक्टीकल ‘ परीक्षेमध्ये ही उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रिकेमध्ये नमूद केले आहे. आपल्या महाविद्यालयात याबद्दल ताब्रेज याने तक्रार केल्यावर ही चूक महाविद्यालयाची नसून, विद्यापीठाची आहे, त्यामुळे त्याने ही तक्रार विद्यापीठाकडे करावी असा सल्ला देऊन महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची बोळवण केली.

विद्यापीठाकडे ही तक्रार घेऊन गेल्यानंतर तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी ही तक्रार ऐकून घेण्यास नकार दिला. उलट ताब्रेज यानेच परीक्षेच्या अर्जामध्ये विषय चुकीचे भरले असावेत, म्हणून त्याची गुणपत्रिका चुकीच्या विषयाकरिता मिळाली असावी, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. आपल्या म्हणण्याच्या पुराव्यादाखल ताब्रेज याने आपले ‘ अॅडमिट कार्ड ‘ देखील सादर केले. त्यावरही ताब्रेजचा विषय इंग्रजी असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. पण तरी ही त्याची गुणपत्रिका मानसशास्त्र विषयासाठी कशी आली, याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही.

Leave a Comment