रुपर्ट मर्डोक यांच्या 21st सेन्च्युरी फॉक्सची मालकी ‘वॉल्ट डिस्ने’कडे


नवी दिल्ली – उद्योजक आणि माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक यांच्या 21st सेन्च्युरी फॉक्सची करमणूक क्षेत्रातील वॉल्ट डिस्ने कंपनीने खरेदी केली. ५२.४ अब्ज डॉलर्सला या दोन्ही कंपन्यांत व्यवहार झाल्यामुळे आता डिस्नेकडे मर्डोक यांच्याकडील स्टार इंडिया या भारतातील मनोरंजन क्षेत्रातील व्यवसाय जाईल. स्टार इंडियाकडे सध्या असणारे ४९ करमणूक चॅनेल, १० क्रीडा चॅनेल आणि हॉटस्टार हा डिजिटल स्ट्रीमिंग व्यवसायासह डिस्नेकडे जाणार असल्यामुळे भारतातील सर्वात मोठा ब्रॉडकास्टर डिस्ने बनणार आहे.

‘यूटीव्ही’ला देखील डिस्नेने खरेदी केले आहे. स्टार इंडियाकडे मालकी असणारी टाटा स्काय ही डीटीएच सेवा दोन कंपन्यांमध्ये झालेल्या या व्यवहारामुळे डिस्नेकडे जाईल. सध्या लहान मुलांचे करमणूक चॅनेल आणि हॉलीवूड चित्रपटांचे वितरण करत असलेल्या डिस्नेला भारतातील व्यवसाय अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल.

२१ व्या शतकातील करमणूक क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार असल्याचे समजले जाते. स्टार इंडिया आणि हॉटस्टारकडे सध्या आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क आहेत. समुहाकडे आठ प्रादेशिक भाषांतील एकूण ५९ चॅनेल आहेत. हे चॅनेल भारत आणि अन्य १०० देशांत पाहिले जातात. स्टार इंडियाचे बाजारमूल्य ९०० ते १०२५ अब्ज रुपये असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment