जगातली काही मौल्यवान फुले


फुले कोणत्याही रंगाची आकाराची असली तरी ती मनाला आनंद देतात. कांही त्यांच्या सुगंधाने तर कांही त्यांच्या सौंदर्याने आपल्याला वेड लावतात. शेकडो वर्षे माणूस फुलांचा वापर सातत्याने करत आला आहे. त्यात देवपूजेपासून, सौंदर्यवतींचे सौंदर्य वाढविण्यापासून ते माणसाच्या अंतिम प्रवासापर्यंत त्यांचा वापर केला जात आहे. फुलांचे अनेक उपयोग आहेत व सजावटीपासून ते औषधी वापरापर्यंत ती अनेक प्रकारे वापरली जातात. जगात हजारो प्रकारची फु ले फुलतात मात्र त्यातील काही फारच महागडी आहेत. त्यांची ही माहिती

ज्युलिएट रोझ- जगात मुळातच गुलांबाना खूप मागणी आहे. प्रेम, ममता व्यक्त करण्यासाठीचे गुलाब प्रतीक आहे. मात्र ज्युलिएट रोझ नावाने मिळणारा गुलाब जगातील सर्वात किमती गुलाब आहे. २००६ सालच्या फ्लॉवर शोमध्ये तो डेव्हीड ऑस्टीन यांनी सादर केला. या गुलाबाला मिलीयन डॉलर गुलाब म्हटले जाते कारण हा गुलाब निर्माण करून त्याचे उत्पादन घेण्यासाठी १५ वर्षे लागली व त्यासाठी ३० लाख डॉलर्स खर्च केले गेले. लग्नासारख्या विशेष समारंभात तो आवर्जून वापरला जातो व त्याची किंमत आहे प्रत्येकी ५ हजार डॉलर्स


लिली ऑफ व्हॅली- या फुलाच्या सौंदर्यावर व त्याच्या मादक गंधावर भुलून जाऊ नका कारण हे अत्यंत विषारी फूल आहे. मात्र त्याचे सुंदर रूपडे व सुगंधामुळेच त्याला मागणीही खूप असून त्याची किंमतही तशीच तगडी आहे. राजेशाही लग्नात वधूसाठी तयार करण्यात येणार्‍या ब्रायडल बुकेमध्ये ते वापरण्यास पसंती दिली जाते. ब्रिटनची युवराज्ञी केट मिडलटनचा बुके याच फुलांमधून तयार केला गेला होता. या फुलाच्या एका डहाळीसाठी ५० डॉलर्स मोजावे लागतात.


केसराची फुले- केशराचा वापर शेकडो वर्षे पदार्थांना रूची व रंग देण्यासाठी केला जात आहे. केशर औषधी आहे. केशराची फुले अत्यंत सुंदर जांभळ्या रंगाची असतात मात्र ही सजावटीसाठी वापरली जात नाहीत तर त्यापासून केशर मिळविण्यासाठीच त्यांचा वापर होतो. जगातील टॉपमोस्ट शेफ केशराचा वापर आवर्जून करतात. ही फुले हाताने तोडावी लागतात व त्यातील पराग म्हणजे केसर ही हातानेच निवडावे लागते. वजनावर या फुलंाची किंमत ठरते. ५०० ग्रॅम केशर मिळविण्यासाठी ८० हजार फुले तोडावी लागतात. केशराची किंमत १५०० पौंड पर्यंत जाते.


आर्किड ही वास्तविक बांडगुळासारखी वाढणारी वनस्पती पण त्याला येणारी सुंदर आकर्षक फुले फारच दुर्मिळ समजली जातात. लकझरी, सौंदर्य, ताकद प्रेमाचे प्रतीक असलेली ही फुले. ही खास प्रकारची आर्किड हवाईतून आयात करावी लागतात व ती अन्यत्र उत्पादित करणे हे अत्यंत अवघड काम आहे. प्रत्येक फुलासाठी २५ डॉलर्स मोजावे लागतात.


ब्रह्मकमळ- निवडुंगासारख्या झाडाला येणारी ही फुले म्हणजे कोमलतेची परिसीमा आहे. याचे नितळ आरस्पानी सौंदर्य व त्याच्या जीवघेणा सुगंध या फुलांना आणखीनच युनिक बनवितो. ही फुले प्राईसलेस म्हणजे अतिमौल्यवान समजली जातात कारण मुळातच ती कांही तासांचे आयुष्य घेऊनच फुलतात. ही फुले मध्यरात्री पूर्ण उमलतात पण दिवस उजाडायच्या अगोदरच कोमेजून जातात.

Leave a Comment