फ्रिजमध्ये शक्यतो ठेवू नयेत या वस्तू


आजकाल घरोघरी फ्रिज वापरले जात आहेत. विविध वस्तू दीर्घकाळ टिकविण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. मात्र संशोधकांनी याबाबत सावधानतेचा इशारा देताना कांही वस्तू फ्रिजमध्ये ठेवू नयेत असा सल्ला दिला आहे. दीर्घकाळ केलेल्या निरीक्षणातून व संशोधनातून हा निष्कर्ष काढला गेला आहे. त्यानुसार ब्रेड फ्रिजमध्ये ठेवू नये कारण तो चिवट बनतोच व त्याच्या चवीतही फरक पडतो. अर्थात ब्रेडपासून बनविलेली सँडविच मात्र फ्रिजमध्ये ठेवली तर ती अधिक टिकतात.

टोमॅटो हा तशा नाशवंतच. त्यामुळे तो आवर्जून फ्रिजमध्ये ठेवला जातो. मात्र तो शक्यतो ताजाच वापरला जावा. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्याचा फ्लेवर व टेस्ट खराब होतेच पण तो शिजण्याची गतीही मंदावते. त्यामुळे ते हवेशीर जागी ठेवावे. कलिंगड कापलेले नसेल तर बाहेरच ठेवावे. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यातील बीटा कॅरोटिन नष्ट होते असे संशोधनात दिसले आहे. कापलेले कलिंगड फ्रिजमध्ये थोड्या काळासाठी ठेवता येईल मात्र ते पूर्ण कव्हर करून ठेवावे. कॉफी साठविताना ती कोरड्या, फार उजेड येणार नाही अशा व थंड जागी साठवावी. फ्रिजमध्ये ठेवायची असेल तर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवावी व महिन्यापेक्षा अधिक काळ ठेवू नये.

लसूण फ्रिजमध्ये ठेवले तर त्याला अनेकदा मोड येतात. शिवाय ते रबरासारखे बनते. खराब व चांगला लसूण यामुळे ओळखता येत नाही. तसेच आंबा, किवी यासारखी फळेही फ्रिजमध्ये ठेवू नयेत कारण ती पिकण्याची क्रिया मंदावते व त्यांची चव बदलते. लोणची फ्रिजमध्ये ठेवू नयेत कारण त्यात अगोदरच प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेली असतात त्यामुळे ती बाहेरही चांगलीच राहतात.

Leave a Comment