फिनलंडने जगाला दिलेल्या काही गोष्टी..


फिनलंड हा देश रशियाच्या अधिपत्यातून स्वतंत्र झाल्याला शंभर वर्षे उलटून गेली आहेत. या शंभर वर्षांच्या काळामध्ये फिनलंड देशाने तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रांमध्ये पुष्कळ प्रगती केली आहे. त्यांच्याकडील वैज्ञानिक शोधांचा फायदा जगभरातील सर्वच देशांना झाला. अशाच काही शोधांबद्दल जाणून घेऊ या.

वारा हा उर्जा देणारा सर्वात अधिक प्रमाणात उपलब्ध असणारा आणि कधीही न संपणारा स्रोत आहे. २०३० सालापर्यंत पृथ्वीवरील एकूण विद्युतनिर्मिती पैकी वीस टक्के विद्युतनिर्माण पवनचक्क्यांच्या मदतीने केले जाईल, असा अंदाज ‘ इको वॉच ‘ द्वारे वर्तविला गेला आहे. पवनचक्कीचे निर्माण सर्वप्रथम फिनलंड मध्ये १९२२ साली फिनिश इंजिनियर सिगर्ड सॅव्होनियस याने केले. त्या काळामध्ये हा शोध अतिशय कुतूहलाचा विषय ठरला असून, त्याकाळी वाऱ्याचा वापर वीज निर्मितीसाठी करण्याची कल्पना कोणालाच सुचली नव्हती, किंवा तशी गरजही भासली नव्हती. तेव्हा तयार करण्यात आलेल्या पवनचक्क्यांचे डिझाईन अतिशय साधे सोपे असून , त्यांना मेंटेन करणे देखील अतिशय सोपे होते. आजही या शोधाचा वापर जगभरातील अनेक देशांमध्ये होत आहे.

क्रीडापटू, किंवा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर एक लहानसे मशीन बांधून त्या द्वारे त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची गती मापणारे हार्ट रेट मॉनिटर देखील फिनलंडनेच जगाला दिले आहेत. १९७७ साली पोलर इलेक्ट्रो नामक फिनिश कंपनीने हे मॉनिटर तयार केले होते. त्याकाळी तयार झालेले मशीन अंगावर घालता येणारे पहिले वायरलेस मशीन होते. पहिले तयार झालेले मशीन बॅटरी वर चालणारे असून, हाताच्या बोटाला जोडले जाऊन, त्या द्वारे हृदयाच्या ठोक्यांची गती पाहिली जात असे.

जेव्हा जगभरामध्ये मोबाईल फोन आले, तेव्हा हे फोन तयार करणाऱ्या काही निवडक कंपन्या बाजारामध्ये होत्या. या कंपन्यांमध्ये अग्रणी होती नोकिया ही कंपनी. ही कंपनी फिनलंडची असून, सर्वात टिकाऊ, वापरण्यास सोपे असे मोबाईल फोन आजतागायत ही कंपनी जगभरामध्ये पुरवत आहे. या कंपनीने मोबाईल फोन्सच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली.

‘sauna‘ ही फिनलंड मध्ये परंपरेने चालत आलेली गोष्ट आहे. बाकी देशांमध्ये ही सुविधा महागड्या रिसोर्ट किंवा स्पा मध्ये उपलब्ध असली, तरी फिनलंड मध्ये sauna ची परंपरा पुष्कळ जुनी आहे. या देशामधील sauna चा इतिहास हजारो वर्षे जुना आहे असे म्हणतात. आठवड्याच्या सुटीच्या दिवशी परिवारातील सदस्य, मित्रपरिवार एकमेकांना sauna च्या निमित्ताने भेटत असतात.

‘फिस्कर्स’ या कंपनीच्या कात्र्या जगभरामध्ये सर्वत्र वापरल्या जातात. ही कंपनी देखील फिनिश असून या कंपनीद्वारे उत्तम प्रतीचे किचन युटीलिटी आयटम्स बनविले जातात. या कंपनीने बनविलेल्या कात्र्या जगभरामध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. यांचे निर्माण फिस्कर्स कंपनीने १९६७ सालामध्ये सुरु केले. तेव्हापासून आजवर या कंपनीने एक बिलियन पेक्षा देखील अधिक कात्र्यांची विक्रमी विक्री केली आहे.

‘ अँग्री बर्ड्स ‘ हे मोबाईल फोन वरील अतिशय लोकप्रिय गेम देखील फिनलंडचीच सर्व जगाला दिलेली भेट आहे. रोव्हियो एन्टरटेनमेंट नामक कंपनीने हे अॅप तयार केले. तेव्हापासून आजवर हे अॅप जगभरामध्ये एक बिलियन पेक्षाही अधिक लोकांनी आपल्या मोबाईल फोनवर डाऊनलोड केले आहे. आता अँग्री बर्ड्स ची खेळणी, चित्रे, तसेच अनेक निरनिराळ्या वस्तू बाजारामध्ये उपलब्ध असून, लहान मुलांसाठी मोठे आकर्षण ठरीत आहेत.

Leave a Comment