आता चार दिवसांचा कसोटी सामना


दुबई – आता चार दिवसांचा कसोटी क्रिकेट सामना खेळविण्याचे प्रयत्न सुरू झाले असून चार दिवसांचा पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेदरम्यान पुढील महिन्यात खेळविला जाणार असून, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने अधिकृत दर्जा दिला आहे.

कसोटी सामना आतापर्यंत पाच दिवसांचा खेळविला जातो. पण आयसीसीने त्याचा एक दिवस कमी करून रोज खेळविल्या जाणाऱ्या षटकांमध्ये वाढ केली आहे. २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर हा सामना पोर्टएलिझाबेथ येथे दिवस-रात्र खेळविला जाईल. या बदलाचे दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी स्वागत केले आहे.

अलीकडे पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट कंटाळवाणे होत असल्याचा दावा केला जात असल्याने कसोटी क्रिकेटला आकर्षक करण्याचे विविध प्रयोग आयसीसी करत आहे. कसोटी विश्वचषकाचीदेखील कल्पना त्यांच्या समोर असली, तरी ती अजून प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. आणखी एक पर्याय म्हणून दिवस-रात्र कसोटी सामनाही खेळविण्यास सुरवात केली आहे.

प्रेक्षकवर्ग मैदानाकडे पाच दिवसांपेक्षा एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट सामन्यासाठी अधिक वळत आहेत. अशातच काही पदाधिकारी आणि माजी खेळाडूंनी कसोटी सामना चार दिवसांचा खेळविला जावा, असे मत मांडले. त्यामुळे आता कसोटी लोकप्रिय करण्यासाठी हा नवा पर्याय या वेळी सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर वापरला जाणार आहे.

चार दिवसांच्या झालेल्या बदलामुळे रोजच्या दिवसाच्या खेळात अर्ध्या तासाने वाढ होणार आहे. तर दिवसभरात ९० ऐवजी होणार ९८ षटके टाकण्यात येतील. त्याचबरोबर फॉलोऑन देण्यासाठी १५० धावांची आघाडी पुरेशी (पाच दिवसांच्या क्रिकेटमध्ये २००) असेल.