गुगलने प्रसिद्ध केला या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींचा अहवाल


मुंबई – २०१७ वर्षात भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींचा गुगलने अहवाल सादर केला आहे. भारतीयांनी वर्षभरात गुगलला कोणकोणते प्रश्न सर्वाधिक विचारले याची यादी यामध्ये देण्यात आली आहे. आधार कार्ड सर्वच महत्त्वाच्या गोष्टींसाठी अनिवार्य करण्यात आल्यामुळे हा मुद्दा वर्षभर चर्चेत राहिला. सर्वाधिक भारतीयांना याबाबत कुतूहल असल्याचे गुगलच्या अहवालातूनही दिसून आले.

भारतीयांनी गुगलला हाऊ टू आणि व्हॉट इजने सुरू होणारे अनेक प्रश्न विचारले. हाऊ टू लिंक आधार विथ पॅन कार्ड हा प्रश्न यामध्ये अग्रणीवर आहे. मोबाईल नंबर, पॅनकार्ड, बँक खाते यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने याबाबतच भारतीयांमध्ये कुतूहल पहायला मिळाले. त्यानंतर रिलायन्सचा जिओ फोनही चांगलाच चर्चेत होता. अनेकांनी गुगलला हा फोन कसा बुक करावा असा प्रश्न विचारल्यामुळे या अहवालात दुसऱ्या क्रमांकावर हाऊ टू बुक जिओ फोन हा प्रश्न आहे. तर, हाऊ टू बाय बिटकॉन इन इंडिया हा तिसरा सर्वाधिक विचारलेला प्रश्न ठरला.

याशिवाय बाहुबली २ ने एकंदर गुगलवर सर्च झालेल्या गोष्टींमध्ये बाजी मारली आहे. एप्रिल २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. साऱ्या भारतीयांना कटप्पाने बाहुबलीला का मारले हा प्रश्न जणू भेडसावत होता. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या बाहुबली द बिगिनींग नंतर दोन वर्षांनी आलेल्या या सिक्वेलने प्रदर्शनापूर्वीच खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्याचा परिणाम गुगल सर्चमध्येही दिसून आला.

क्रिकेट व बॉलिवूडचे चाहते सर्वाधिक भारतात आहेत. गुगल सर्चच्या अहवालातून नेहमीप्रमाणेच यंदाही याची प्रचिती आली. भारतीयांनी बाहुबली २ नंतर गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींमध्ये इंडियन प्रमियर लीग, लाईव्ह क्रिकेट स्कोअर, दंगल, हाफ गर्ल फ्रेंड, बद्रिनाथ की दुल्हनिया, मुन्ना मायकल, जग्गा जासूस, चॅम्पियन्स ट्रॉफी, रईस यांचा समावेश आहे.

Leave a Comment