व्यक्तीचा रक्तगट आणि स्वभाव यांचा परस्परसंबंध


एखाद्या व्यक्तीचा रक्तगट आणि त्याचा स्वभाव यांच्यातील परस्पर संबंध हा वैज्ञानिकांच्या कुतूहलाचा विषय आहे. त्याचबरोबर ठराविक रक्तगटाच्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये काही ठराविक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात किंवा नाही, हा देखील संशोधनाचा विषय ठरत आला आहे. या बद्दलचे शोधकार्य जपान येथील मासाहिको नोमी नामक वैज्ञानिकाने प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीचा रक्तगट आणि त्याचा स्वभाव यांचा परस्परांशी थेट संबंध आहे.

जगातील ४० टक्के जनसंख्येचा रक्तगट ‘ अ ‘ आहे. ( अ पॉझीटीव्ह आणि निगेटिव्ह ). समजूतदारपणा, नीटनेटकेपणा, सारासार विचार आणि शांतताप्रिय असा या रक्तगटाच्या लोकांचा स्वभाव असतो. ह्या रक्तगटाचे लोक आपले आयुष्य स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणे पसंत करतात. कोणत्याही प्रकारच्या विवादास्पद परिस्थितीमध्ये गुंतून पडणे या लोकांना मानवत नाही. आपल्या भावनांवर या व्यक्तींचे उत्तम नियंत्रण असते. प्रत्येक गोष्टीबाबत यांचे विचार ठरलेले असून, त्या विचारांपासून वेगळे वागणे या लोकांना जमत नाही. कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना, त्यात यशस्वी होण्याचा आत्मविश्वास या लोकांमध्ये असतो. तसेच कोणतेही काम ह्या व्यक्ती अतिशय जबाबदारीने पर पाडतात. काही प्रसंगी या व्यक्ती आपल्या मनासारखे एखादे काम होत नाही असे पाहून काहीशा चिडचिड्या होतात. आपली बाजू, मते याबाबत या व्यक्ती अतिशय आग्रही असतात. पण त्याचबरोबर हाती घेतलेले प्रत्येक काम या व्यक्ती अतिशय एकाग्रतेने पूर्ण करतात.

जगातील ११ टक्के लोकांचा रक्तगट ‘ ब ‘ आहे. या व्यक्ती अतिशय भावूक, आपल्या मनाचा सहजी थांग न लागू देणाऱ्या, आत्मविश्वास असणाऱ्या, आणि क्षणात मन बदलणाऱ्या असतात. ह्या रक्तगटाच्या व्यक्ती अतिशय उत्साही स्वभावाच्या असून, सतत काहीतरी नवे करुन बघण्याच्या मागे असतात. या व्यक्ती अतिशय भावनाप्रधान असून, प्रत्येक काम अतिशय मन लावून करणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे मित्रपरिवारात या व्यक्ती अतिशय लोकप्रिय असतात. पण क्वचित प्रसंगी भावनेच्या भरामध्ये ह्या व्यक्ती आत्मकेंद्री प्रवृत्तीच्या बनतात. त्यांच्या मनामध्ये नक्की कसले विचार सुरु आहेत, याचा थांग लागणे सहज शक्य नसते. त्यामुळे एखादे काम करताना त्याबद्दल कुठे फार वाच्यता न करण्याकडे यांचा कल असतो. त्यामुळे यांच्याबद्दल इतराच्या मनामध्ये साशंकता असते. पण ह्या व्यक्तींना जे चांगले ओळखतात, त्यांना या व्यक्तींविषयी पूर्ण खात्री असते.

‘ ओ ‘ रक्तगटाच्या व्यक्तींची जनसंख्या जगामध्ये ४५ टक्के इतकी आहे. ह्या व्यक्ती अतिशय जबाबदार, वेळेच्या बाबतीत काटेकोर, काहीशा सावध आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावाच्या असतात. या व्यक्ती कोणतीही जबाबदारी घेताना, अतिशय सावधपणे आणि काळजीपूर्वक सर्व गोष्टींचा विचार करून मगच जबाबदारी स्वीकारणाऱ्या असतात. पण एकदा का कुठल्या कामाची जबाबदारी यांनी घेतली, की ती पूर्ण केल्याशिवाय ह्या व्यक्ती मागे फिरत नाहीत. ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला जाऊ शकतो, अश्या या व्यक्ती असतात. वेळ पाळण्याच्या बाबतीत ह्या व्यक्ती अतिशय काटेकोर असून एकदा हाती घेतलेले काम पूर्ण करायचेच अशी त्यांची जिद्द असते. ह्या व्यक्ती अतिशय उत्तम जोडीदार ठरतात. समजूतदारपणा, इतरांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रवृत्ती, आणि इतरांना मानसिक आधार देण्याची प्रवृत्ती यांच्यामध्ये असते. या व्यक्तींना कुठल्या ही बाबतीत धोका पत्करणे मान्य नसते. हाती घेतलेल्या कामामध्ये कोणतीही अडचण आल्यास त्यातून मार्ग काढण्याची हिम्मत या व्यक्तींमध्ये असते.

‘ एबी ‘ हा रक्तगट अतिशय दुर्मिळ समजला जात असून हा रक्तगट जगातील केवळ ४ टक्के लोकांचा आहे. ह्या रक्तगटाच्या व्यक्ती स्वभावाने अतिशय महत्वाकांक्षी असतात. तसेच कोणत्याही गोष्टीत पुढाकार घेण्याची त्यांची तयारी असते. अगदी अनोळखी लोकांच्यात देखील ह्या व्यक्ती सहज मिसळतात, यांचा आत्मविश्वासही अफाट असतो. एखाद्या व्यक्तीसाठी कोणते काम करण्याची वेळ जर ह्या रक्तगटाच्या व्यक्तींवर आली, तर ते काम अतिशय निरपेक्ष भावनेने करणाऱ्या या व्यक्ती असतात. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या अशा या व्यक्ती आहेत. पण त्याचबरोबर आपल्या मनातील सर्वच गोष्टी हे लोक उघडपणे बोलून दाखवत नाहीत. ह्यांच्याकडे कोणी मदतीची याचना केल्यास या व्यक्ती आनंदाने मदत करतील, पण स्वतःसाठी मात्र कोणत्याही प्रकारची मदत मागणे या व्यक्तींना रुचत नाही. ह्या व्यक्ती स्पष्टवक्त्या असतात, त्यामुळे काही वेळा यांच्या बोलण्याने इतर जण दुखाविले जाण्याची शक्यता असते. पण गोड गोड बोलून खोटेपणा करणे या व्यक्तींच्या स्वभावातच नसते. त्यांच्या मनामध्ये जे आहे, ते बेधडकपणे बोलून टाकण्याऱ्या या व्यक्ती आहेत.

Leave a Comment