रात्रीत बँकांनी एटीएम मध्ये पैसे न भरण्याचा प्रस्ताव


रात्रीच्या वेळी एटीएममध्ये रोकड भरताना व्हॅनवर हल्ले करण्याचे तसेच व्हॅन लुटण्याचे प्रकार वाढत चालल्याने शहरी भागात रात्री ९ नंतर एटीएममध्ये पैसे न भरण्याचा प्रस्ताव गृहमंत्रालयाने सादर केला असून तो कायदा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविला जात असल्याचे समजते.गृहमंत्रालयाने या संदर्भात खासगी सुरक्षा एजन्सींसाठी लागू केलेल्या नियमात हे नवीन मानक समाविष्ट करण्याचा विचार असल्याचे कळविले आहे.

या नव्या प्रस्तावानुसार ग्रामीण भागातील एटीएममध्ये सायंकाळी ६ पर्यंत, नक्षलग्रस्त भागातील एटीएममध्ये दुपारी चार पर्यंतच रक्कम भरली जावी असे म्हटले गेले आहे. ज्या व्हॅन पाच कोटींपेक्षा जास्तीची रक्कम नेत असतील त्यांच्या सुरक्षेत सीसीटीव्ही, जीपीएस सुविधेसह दोन सशस्त्र गार्ड असावेत असे बंधन घातले जात आहे शिवाय संकट काळात या गार्डना तसेच चालकाला व्हॅन सुरक्षित ठिकाणी कशी न्यायची याचे प्रशिक्षणही दिले जावे असे नमूद केले गेले आहे.

आकडेवारीनुसार दररोज ८ हजार खासगी व्हॅन १५ हजार कोटींची रक्कम विविध ठिकाणच्या एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात असतात. कांही व्हॅन ५ कोटींपर्यंतची रक्कम रात्रभर खासगी सुरक्षेत ठेवतात व नंतर ती एटीएम मध्ये भरली जाते. मात्र अनेकदा पाळत ठेवून अशा व्हॅन लुटल्या जातात व लुटला गेलेला पैसा परत मिळविणे जिकीरीचे होते. हे लक्षात घेऊन वरील नियम केला जात आहे. कायदा मंत्रालयाच्या मंजुरीनंतर त्या संदर्भातले आदेश सर्व राज्यसरकारांना दिले जाणार आहेत.

Leave a Comment