भारतात शाओमी विकणार कार्ससह अनेक वस्तू


चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतीय स्मार्टफोन बाजारात चांगले बस्तान बसविल्यानंतर आता भारतीय बाजारातील अनेक क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भारतात व्यापार वृद्धीसाठी कंपनीने रजिस्टार ऑफ कंपनीज कडे रेग्युलेटरी फायलिंग दाखल केले असून त्यात इलेक्ट्रीकसह सर्व प्रकारची वाहने, कपडे, लाईफस्टाईल वस्तू, संगणक, गेमिंग कन्सोल, लॅपटॉप, संगणक अॅक्सेसरीज या शिवाय पेमेंट बँक व्यवसाय, ट्रान्स्पोर्ट, वाहतूक उपकरणे, व्हर्च्युअल नेटवर्क अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.

याबरोबरच नेटवर्क इक्विपमेंट, कपडे, खेळणी, बॅक पॅक्स, सुटकेसेस अशा वस्तूही कंपनी विकणार आहे. पुढच्या वर्षी कंपनी आयपीओ काढत आहे व त्यातून मिळालेली रक्कम भारतीय बाजारात गुंतविण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे. चीनमध्ये कंपनी इलेक्ट्रीक बाईक्स, फोल्डेबल बाईक्स, लॅपटॉप, टॅब्लेट, टिव्ही, स्मार्ट लाईट, इलेक्ट्रीक टूथब्रश, ब्लड प्रेशर मॉनिटर अशा अनेक वस्तू विकत आहेच. भारतीय बाजारात ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारात वरील वस्तू विक्रीचा कंपनीचा विचार आहे.

Leave a Comment