थंडीत हिल स्टेशन औलीची मजा कांही औरच


सर्वसाधारणपणे पर्यटनाला जाण्याच्या जागा हवामानानुसार ठरविल्या जातात. म्हणजे थंडीत कुणी हिल स्टेशनला फारसे प्राधान्य देणार नाही त्यावेळी साधारण उबदार ठिकाणी जाण्यास प्राधान्य दिले जाते तर उन्हाळ्याच्या दिवसांत हिल स्टेशनला अधिक पसंती दिली जाते. उत्तराखंड, हिमाचल अशा भागात उन्हाळ्यात जायचे असा सर्वसाधारण प्रघात असला तरी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात जोशी मठपासून जवळच असलेली औली त्याला सणसणीत अपवाद आहे. येथे उन्हाळ्याइतकीच गर्दी कडाक्याच्या थंडीत होत असते कारण त्यावेळी हे ठिकाण स्कीईंगसाठी अतिशय योग्य ठरते तसेच संपूर्ण बर्फाची चादर ओढलेली औली रोपवे पाळण्यातून न्याहाळणे हाही फार रोमांचकारी अनुभव असतो.


समुद्रसपाटीपासून ९ हजार फूट उंचीवरचे हे ठिकाण अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. चारी बाजूंनी सुंदर हिमशिखरे, देवदारची घनदाट जंगले आणि भारतातील सर्वात वेगवान समजला जाणारा रोपवे पर्यटकांना आकर्षून घेण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. देवदार जंगलंाच्या माथ्यावरून दुसर्‍या शिखराच्या टोकावर नेऊन संपूर्ण औलीचे तसेच आसपासच्या निसर्गरम्य परिसराचे दर्शनसुख देणारा येथील रोपवे ढगातून प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव देतो. नजर जाईल तेथपर्यंत बर्फाच्छादित शिखरांचा मनोहर देखावा येथून न्याहाळता येतो.

या भागात आकाराने मोठे ब्लूशिप आढळतात. ७० इंची लांब शिंगाचे हे बकरे खास आकर्षण आहे. उत्तराखंडमध्ये भरणार्‍या विंटर स्पोर्टसचा हा शुभंकर आहे. येथे राहण्यासाठी गढवाल निगमचे गेस्ट हाऊस आहे तसेच इंडोतिबेट बॉर्डर पोलिस रेस्टॉरंट शिवाय अन्य कॉटेज, हटस आहेत. येथे मुक्काम करायचा नसेल तर दिवसभर येथील निसर्गाचा आनंद घेऊन जोशी मठ येथे मुक्कामास येता येते. जोशी मठला मुक्कामासाठी खूप पर्याय आहेत.

Leave a Comment