या विमानतळांवर आहेत किसिंग झोन्स


भारतात झारखंड राज्यात नुकत्याच घेण्यात आलेल्या चुंबन स्पर्धेवरून टीकेचे मोहोळ उठले आहे. जगाच्या अनेक देशात सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेण्यास परवानगी नाही. मात्र काही देशांनी त्यांच्या विमानतळावर खास किसिंग झोन्स निर्माण केले आहेत व लोक त्याचा ज्या प्रमाणे वापर करत आहेत ते पाहून त्यावर वेळेची पाबंदीही घातली आहे.

विमानतळावर पोहोचवायला येणारे व जाणारे प्रवासी यांच्यात निरोपाचा कांही काळ फार महत्त्वाचा असतो. त्यातही हे प्रेमी जोडपे असेल तर मग ही घडी आणखीनच हुरहुरी बनते. अशा वेळी नुसते जवळ घेऊन कांही जणांना भागत नाही तर चुंबनातून आपला विरह लवकरच संपेल असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा असे झाले आहे की या किसिंगमुळे आजूबाजूला प्रवाशांची गर्दी होते. कांही जणांच्या फ्लाईटही या मुळे चुकल्या आहेत. त्यामुळे डेन्मार्क, सिंगापूर, हाँगकाँग, बाली, रोम, पॅरिस, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को येथील विमानतळावर खास किसिंग झोन बनविले गेले आहेत. सिगरेट झोनप्रमाणेच हे थोडे आडबाजूला आहेत.


या झोनना किसिंग झोन असे नांव अनेक ठिकाणी नाही त्याऐवजी किस अॅन्ड गुडबाय, मिट अॅन्ड फ्लाय झोन अशी नांवे दिली गेली आहेत.डेन्मार्कच्या अलबोर्ग विमानतळावर किसिंग साठी ३ मिनिटांची वेळ आहे तर लग्झेंबर्ग विमानतळावर ती ३० मिनिटे आहे. सिंगापूरच्या चांगी विमानतळावर यासाठी १० मिनिटे दिली गेली आहेत.रोमच्या विमानतळावर ती १५ मिनिटे आहे. बाली एअरपोर्टवर ती शून्य मिनिटे म्हणजे लगेच आवरा आणि निघा अशी आहे.