पुन्हा चंद्रावर जाणार अमेरिकी अंतराळवीर


अमेरिकी अंतराळवीरांना पुन्हा चंद्रावर व नंतर मंगळावर पाठविणाऱ्या अंतराळ कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे. मानवयुक्त अंतराळ शोध कार्यक्रमाचे पुनरुज्जीवन करण्याचे आदेश ट्रम्प यांनी नॅशनल एअर अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनला (नासा) दिले आहेत. हा कार्यक्रम वर्ष 2011 मध्ये निलंबित करण्यात आला होता.

“दीर्घकालीन अन्वेषण आणि वापरासाठी 1972 नंतर प्रथमच अमेरिकी अंतराळवीरांना चंद्राकडे परतण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.

“यावेळी आम्ही केवळ आपला ध्वज लावून पदचिन्हे मागे सोडणार नाही, तर आम्ही मंगळावर जाणाऱ्या मोहिमेची पायाभरणी करू,” असेही ते म्हणाले.

या आदेशावर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम व्हाईट हाऊसमध्ये झाला. यावेळे अनेक अंतराळवीर आणि माजी अंतराळवीर उपस्थित होते.

यांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारे एडविन “बझ” ऑल्ड्रिन आणि हॅरिसन “जॅक” श्मिट या दोघांचाही समावेश होता. श्मिट यांनी अपोलो 17 यानातून चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर बरोबर 45 वर्षांनी हा स्वाक्षरी समारंभ होत असल्याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले.

या कार्यक्रमातील मानवरहित यानाचे प्रक्षेपण एक वर्षापेक्षा किंचित अधिक काळाने होऊ शकेल, असे युनिव्हर्सिटी स्पेस रीसर्च असोसिएशनमधील चंद्र आणि ग्रह संस्थाचे प्रमुख, डेव्हिड क्रिंग यांनी सांगितले.

Leave a Comment