भारतातील काही घटनांपुढे विज्ञान देखील हतबल


आजच्या युगामध्ये मनुष्य परग्रहावर पोहोचलेला आहे. विज्ञानाच्या मदतीने मनुष्याने निसर्गामध्ये लपलेल्या अनेक रहस्यांचे आकलन करवून घेतले आहे. झपाट्याने वाढलेल्या तंत्रज्ञानाने आणि विज्ञानातील प्रगतीने कोणतीही गोष्ट आता मनुष्याच्या आवाक्याबाहेर राहिलेली नाही. पण या सृष्टीमध्ये काही रहस्ये अशी आहेत, काही घटना अश्या घडत आहेत, ज्यांचे कारण आजवर कोणीही शोधून काढू शकलेले नाही. विज्ञानाकडे किंवा इतिहासाकडे देखील या घटना का घडतात याचे कोणतेही सपष्टीकरण नाही. भारतामध्ये ही काही घटना अश्या घडून गेल्या ज्यांच्यामागचे कारण आजतागायत समजले नाही.

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताज महाल, भारतातील आग्रा शहरामध्ये आहे. ताजमहालचे निर्माण शाहजहान ने मुमताज साठी करविले होते, हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण काही इतिहासकारांच्या मते ताजमहाल ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पूर्वी प्राचीन काळातील शिवमंदिर असून, त्या मंदिराचे नाव ‘तेजो महाल‘ असे होते. शाहजहानने हे मंदिर ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ताज महालाचे निर्माण करविले असे म्हटले जाते. पण आजवर तसे स्पष्टपणे सांगणारे फारसे पुरावे सापडले नाहीत. पण तरी ही ताज महालामध्ये एक कक्ष असा आहे, जो सदैव बंद असतो, आणि तिथे जाण्याची परवानगी कोणालाही नाही. या कक्षामध्ये नेमके काय ठेवले आहे, याचे उत्तर कोणाकडेही नाही. इतिहासकार देखील या बाबतीत काही नेमके सांगू शकत नाहीत. ताजमहालाच्या ठिकाणी पूर्वी असलेल्या मंदिराच्या खुणा या कक्षात आहेत असे म्हणतात, पण याची कुठल्याही प्रकारे खात्रीशीर माहिती आजवर उपलब्ध नाही.

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील एका गावामध्ये ‘बुलेट’ मोटारसायकलची पूजा केली जाते. या मागची कथा अशी, की १९८८ साली ओम सिंह राठोड नामक एक मनुष्य हे बुलेट घेऊन आपल्या सासुरवाडीस जाण्यास निघाला. वाटेमध्ये, एका झाडावर त्यांची बुलेट धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये ओम सिंहचे निधन झाले. या अपघातानंतर पोलिसांनी ही बुलेट आपल्या ताब्यात घेतली, पण काही वेळाने ती बुलेट आपोआप परत अपघातस्थळी आली. असे अनेकवेळा घडल्यानंतर या मागे नक्कीच काहीतरी चमत्कार असल्याचे बोलले जाऊ लागले. बुलेट पोलीस स्टेशनआर आणली गेली असताना, ती परत अपघातस्थळी कशी जाऊन पोहोचते, यामागील कारण कोणीही सांगू शकले नाही. तेव्हापासून गावकरी या चमत्कारी बुलेटची पूजा करीत असतात.

आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिरामध्ये सुमारे सत्तर दगडी खांब आहेत. या खांबांवर केलेले कोरीव काम या मंदिराचे आकर्षण आहेच, पण मुख्य आकर्षण आहे एक विशेष खांब. हा खांब अधांतरी असून, हा कशाच्या आधाराने उभा आहे, हे आजतागायत कोणाला समजू शकलेले नाही. इतकेच नाही, लोक जमीन आणि खांबाच्या मध्ये असलेल्या पोकळ जागेतून कपडा सरकवून पाहतात, आणि कपडा सरकतो देखील. पण हा खांब अधांतरी कसा उभा आहे, या रहस्याचा उलगडा आजवर झालेला नाही.

उत्तराखंडातील हिमालयामध्ये रूपकुंड नावाचे सरोवर आहे. या सरोवराला ‘ कंकाल झील ‘, म्हणजेच हाडाचे सापळे असलेले सरोवर असे ही म्हणतात. थंडीमध्ये या सरोवरातील पाणी गोठलेले असते. पण थंडीनंतर जेव्हा ह्या सरोवरातील पाणी वितळते, तेव्हा या पाण्यामध्ये मानवी हाडांचे सांगाडे नजरेस पडू लागतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे सापळे नवव्या शतकातील आदिवासींचे असण्याची शक्यता आहे. हे आदिवासी बर्फावृष्टीमध्ये मृत्युमुखी पडून त्यांचे सांगाडे या ठिकाणी राहिले असावेत असा वैज्ञानिकांचा कयास आहे.

Leave a Comment