बंगळुरुमध्ये गाजलेले ‘बिटकॉईन वेडिंग’


बंगळुरूमध्ये नुकतेच पार पडलेले हे लग्न एरवी इतर लग्नांसारखेच आहे. पण, येथे वधूवरांना मिळालेल्या आहेरात वेगळेपण आहे.

शनिवारी दक्षिण बंगळुरूमध्ये प्रशांत शर्मा आणि नीती श्री यांचे लग्न पार पडले. लग्नाला आलेले पाहुणे रिकाम्या हाताने लग्नाला आले होते. म्हणजे त्यांच्या हातात भेटवस्तू नव्हती. कारण, नवरामुलगा प्रशांतचा तसा आग्रहच होता. त्यांना आहेर भेट वस्तूच्या स्वरूपात नव्हे तर क्रिप्टो करन्सीच्या रूपात हवा होता.

लग्नाला आलेल्या १९० पैकी १५ जणांनी भेटवस्तू बरोबर आणल्या होत्या. इतरांनी आम्हाला बिटकॉईन दिल्याचे, प्रशांत याने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मला मिळालेली रक्कम मी उघड करणार नाही. पण, लाखभर रुपये मला नक्कीच मिळाले आहेत, प्रशांत सध्या आपल्या बिटकॉईनच्या कल्पनेवर खूश आहे.

बंगळुरूमध्ये एक स्टार्टअप कंपनी प्रशांत आणि त्यांची पत्नी निती चालवतात. माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित ही कंपनी असल्यामुळे त्यांना क्रिप्टो करन्सीची कल्पना सुचली. लग्नाला आलेले आमचे बहुतेक मित्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच काम करतात. त्यामुळे तंत्रज्ञान आणि भेटवस्तू देण्याची परंपरा यांचे मीलन घडवून आणण्याचे आम्ही नक्की केले. यासाठी आम्ही आमच्या पालकांनाही विश्वासात घेतले. आमचा निर्णय त्यांना देखील पटला. मग आम्ही ते प्रत्यक्षात आणले, बीबीसीला प्रशांत यांने आपली कल्पना समजावून सांगितली. काही मित्र होते, ज्यांनी पारंपरिक भेटवस्तूंना अगदीच फाटा दिला नाही. भेटवस्तूही त्यांनी आणली आणि बिटकॉईनही जमा केल्याचे प्रशांत सांगतो. प्रशांत मूळचा जमशेदपूरचे असून नीती बिहारमधील पाटणाची आहे.

Leave a Comment