पोट बिघडल्यावर या पदार्थांचे सेवन टाळा


कधी अपथ्य झाले असल्यास किंवा वारंवार प्रवास केल्याने झालेल्या खाण्यापिण्यातील बदलामुळे क्वचित पोट बिघडण्याची तक्रार उद्भवू शकते. पोट बिघडल्याने सतत जुलाब होऊन शरीरामध्ये अशक्तपणा येतो, व शरीरामध्ये उत्साह राहत नाही. त्यामुळे काम करणे ही सुचत नाही, आणि मनासारखा आराम देखील मिळत नाही. वारंवार जुलाब झाल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डीहायड्रेशन होते, व परिणामी रक्तदाब खालावू शकतो. अश्या स्थितीत खाण्यापिण्याचे पथ्य काळजीपूर्वक सांभाळण्याची गरज आहे.

पोट बिघडले असताना तिखट, मसालेदार पदार्थांचे सेवन करणे टाळायला हवे. मसालेदार, तिखट पदार्थांमुळे पोटामध्ये जळजळ होऊन पोट आणखी बिघडू शकते. त्याचबरोबर पोटदुखी देखील उद्भवू शकते. त्यामुळे पोट बिघडले असताना तिखट, मसालेदार पदार्थ सेवन करू नयेत. एरव्ही देखील जास्त तिखट किंवा अतिशय मसालेदार पदार्थ खाणे टाळावयास हवे.

दुधासारख्या पदार्थांना पचविण्याकरिता पोटामध्ये लॅक्टोज एन्झाईमची गरज असते. पोट बिघडले असताना हे एन्झाइम पोटामध्ये कमी प्रमाणात तयार होत असल्याने दुधासारख्या पदार्थांचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पोट बिघडले असताना दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास पोट फुगणे, गॅसेस होणे या ही तक्रारी सुरु होतात. त्याचप्रमाणे फ्लॉवर आणि कोबी सारख्या भाज्यांचे सेवन देखील या काळामध्ये टाळायला हवे.

पोट बिघडले असताना गोड पदार्थांचे सेवन देखील पोट बिघडले असताना प्रकृतीस अपायकारक ठरू शकते. गोड पदार्थांच्या सेवनामुळे पोटामध्ये गॅसेस होऊ शकतात, तसेच पोटदुखी उद्भवून पाण्यासारखे पातळ जुलाब होऊ शकतात. त्यामुळे गोड पदार्थांचे सेवन या काळामध्ये टाळायला हवे.