जीएसटी, नोटबंदीतून सावरण्यासाठी लागतील दोन वर्षे – रेड्डी


जीएसटी आणि नोटबंदी या दोन पावलांमुळे अर्थव्यवस्थेला जो धक्का लागता आहे, त्यातून सावरण्यासाठी देशाला किमान दोन वर्षे लागतील, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांनी म्हटले आहे. अशा उपायांमुळे या वर्षी सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) किती वाढ होईल, हे सांगणे अवघड झाले आहे, असेही ते म्हणाले आहेत.

“सध्या तरी आर्थिक वाढीबाबत कोणताही अंदाज करणे किंवा अर्थव्यवस्था पुन्हा 7.5 किंवा 8 टक्क्यांचा वाढीचा दर गाठेल का, हे सांगणे हे अवघड काम आहे. ही स्थिती पुढील 24 महिने बदलेल असे वाटत नाही,”असे रेड्डी म्हणाले.

मुंबईत काही पत्रकारांशी संवाद साधताना रेड्डी म्हणाले, ‘‘हा एक झटका असून त्याची सुरूवात नकारात्मक धारणेने झाली आहे. यात काही सुधारणा होऊ शकते आणि त्यानंतर काही फायदा मिळू शकतो. सध्यातरी यात त्रास आहे आणि लाभ नंतर मिळेल. किती फायदा होईल आणि किती कालखंडानंतर मिळेल, हे पहावे लागेल.”

‘‘या धक्यांमुळे जो त्रास झाला तो कमी होत असून सकारात्मक वातावरण अद्याप यायचे आहे. ते येईल अशी मला आशा आहे,”अशी पुस्तीही रेड्डी यांनी जोडली.

Leave a Comment