आता कोलकत्यामध्ये जगातील सात आश्चर्ये…


कोलकाता शहरवासियांना आणि या शहराला भेट देण्यासाठी बाहेरून आलेल्या लोकांना आता कोलकातामध्ये राहूनच ताज महालाचे दर्शन घडणार आहे, द ग्रेट वॉल ऑफ चायना पाहता येणार आहे, आणि इजिप्तमधील द ग्रेट पिरॅमिड्सला देखील भेट देता येणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ‘ ड्रीम प्रोजेक्ट ‘ म्हणून ओळखले जाणाऱ्या, ‘ सेव्हन वंडर्स ऑफ द वर्ल्ड ‘या नावाने तयार केल्या गेलेल्या, जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती ( replica ) आता कोलकातामधील इको पार्क या ठिकाणी पहावयास मिळणार आहेत.

पेट्रा जॉर्डनची प्रतिकृती ६४० चौरस मीटरच्या क्षेत्रात तयार करण्यात आली असून, या ठिकाणी तेरा मीटर उंचीचे तीन डोंगर बनविण्यात आले आहेत. ही प्रतिकृती मूळच्या शिल्पाशी हुबेहूब मिळती जुळती असून, इतर सर्व प्रतिकृती देखील मूळच्या शिल्पांशी हुबेहूब मेळ असणाऱ्या आहेत. पश्चिम बंगालच्या हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ( HIDCO ) तर्फे या इको पार्क चे निर्माण केले गेले असून, या पार्कचा विस्तार ४८० एकर जागेमध्ये आहे.

या ठिकाणी बनविण्यात आलेली ताजमहालाची प्रतिकृती ४.२५ मीटर उंचीची असून, २२.५ x २२.५ चौरस मीटर इतकी जागा या प्रतिकृतीने व्यापलेली आहे. या ठिकाणी यमुना नदीची प्रतिकृतीदेखील तयार करण्यात आली असून, या नदीवर दोन्ही बाजूला पूल देखील बांधलेले आहेत. ताजमहालच्या व्यतिरिक्त येथे ‘ द ग्रेट वॉल ऑफ चायना’, इजिप्तमधील ‘ पिरॅमिड ‘ आणि ‘ स्फिंक्स ‘, ब्राझील येथील ‘ क्राइस्ट : द रीडीमर ‘, चिली देशातील ‘ इस्टर आयलंड स्टॅच्यू ‘, इटलीमधील ‘ कोलोसियम ‘, आणि जॉर्डन येथील ‘ द लॉस्ट सिटी ऑफ पेट्रा ‘ ही सर्व आश्चर्ये आता लोकांना एकाच ठिकाणी पहावयास मिळणार आहेत. ह्या अभिनव कल्पनेमुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील अशी आशा केली जात आहे.

Leave a Comment