महाबलीपुरम – भव्य मंदिरांचे शहर


चेन्नईपासून अवघ्या ६० किमी असलेले महाबलीपुरम हे भव्य मंदिरे, स्थापत्य व सुंदर सागरतटासाठी जगभरात प्रसिद्ध अ्रसलेले शहर आहे. बंगाल खाडीच्या तटावर वसलेले हे शहर पूर्वी मामल्लापुरम नावाने ओळखले जात असे. सातव्या शतकातील हे शहर पल्लव राजांच्या राजधानीचे शहर होते. येथील द्रविड शैलीतील वास्तूकला जगभरात प्रसिद्ध असून दरवर्षी येथे शेकडो देशी विदेशी पर्यटक हजेरी लावतात.

२७ मीटर लांब व ९ मीटर रूंदीच्या भव्य खडकावर कोरली गेलेली नक्षी येथील एक प्रमुख आकर्षण आहे. अर्जुन पॅलेस नावाने हा खंड ओळखला जातो. या विशाल शिलाखंडावर ईश्वर, मानव, पशु, पक्षी अतिशय सुंदर कोरले गेले आहेत. समुद्र किनार्‍यावर प्राचीन मंदिर असून ते शेार टेंपल म्हणून ओळखले जाते. आठव्या शतकातील हे मंदिर द्रवीड वास्तूशैलीचा उत्तम नमुना आहे. हा तीन मंदिरांचा समूह असून मधले मंदिर विष्णुचे आहे तर त्याच्या बाजूने दोन शिवमंदिरे आहेत. येथे समुद्राच्या लाटा येऊन थडकतात.


याच भागात महाभारतातील पाच पांडवांच्या नावाचे पाच दगडी रथ आहेत त्यांना पांडव रथ असेच म्हणतात. पैकी चार रथ अखंड शिळेतून कोरले गेले आहेत. द्रौपदी व अजुर्नाचा रथ चौकोनी आकाराचा आहे. यात धर्मराजाचा रथ सर्वात उंच आहे. खडकातून कोरून जी मंदिरे देशात बनविली गेली आहेत त्यातील एक येथेही पाहायला मिळते. त्याला कृष्ण मंडप असे म्हणतात. येथील भितींवर ग्रामीण जीवनाची झलक पाहायला मिळते तसेच गोवर्धन पर्वत उचललेल्या कृष्णाचे कोरीव शिल्पही येथे आहे. वराह गुहेत विष्णुच्या वराह व वामन या अवतारांचे दर्शन घडते. सातव्या शतकातील महिषासूर मर्दिनी गुहा कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे.

येथे जवळच एक संग्रहालय असून त्यात स्थानिक कलाकारांनी बनविलेल्या मूर्तींचा संग्रह केला गेला आहे. येथे जवळपास ३ हजार मूर्ती आहेत व त्या लाकूड, दगड, सिमेंट व पितळी धातूपासून बनविल्या गेल्या आहेत. येथून १४ किमीवर क्रोकोडाईल पार्क व सर्पोद्यानही आहे.

Leave a Comment