नोकरदारांना पुढच्या वर्षी मिळणार चांगली पगारवाढ


नवी दिल्ली : नोकरदार वर्गासाठी २०१७ हे वर्ष चढ-उताराचे ठरले आहे. पण नोकरादारांसाठी आगामी २०१८ हे वर्ष चांगले असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, नोकरदारांना २०१८मध्ये १० ते १५ टक्के पगारवाढ मिळू शकते, असा दावा मॅनपॉवर ग्रुपच्या आर्थिक वर्षासंदर्भातील अहवालातून करण्यात आला आहे.

विविध कंपन्यांना रोजगाराच्या प्रश्नावर मॅनपॉवर ग्रुप ही कंपनी सल्ला देते. आपला अहवाल नुकताच या कंपनीने प्रसिद्ध केला आहे. २०१८मध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असेही यात म्हटले आहे. कापड उद्योगाला चालू वर्षात नोटाबंदीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. पण या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत मंदीनंतर रोजगाराच्या संधीमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे.

कंपनीच्या अहवालात म्हटले आहे की, रोजगाराच्या नवीन संधी जानेवारी ते मार्च या तिमाहीत उपलब्ध होण्यामध्ये २२ टक्क्यांची घट झाल्यानंतर ही घसरण एप्रिल ते जून दरम्यान देखील १९ टक्के होती. यानंतर जुलै ते सप्टेंबर दरम्यान रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यात १६ टक्क्यांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. पण रोजगाराच्या नव्या संधी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या तिमाहीत उपलब्ध होण्यात तब्बल २४ टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद करण्यात आली.

त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी २०१८मध्ये उपलब्ध होण्याच्या प्रमाणात सुधारणा होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यामध्ये मोबाईल उत्पादक आणि सेवा पुरवणाऱ्या कंपनी, फायनान्स क्षेत्र आणि स्टार्ट-अपसह अनेक क्षेत्रातील रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल.

Leave a Comment