अॅलर्जी, अस्थामा अशा विकारांपासून लहान मुलांचा बचाव करण्याकरिता


सध्या सर्वच शहरांमधून सतत वाढत असलेले प्रदूषण, हवामानामध्ये अचानक होणारे बदल, आपल्या धावत्या जीवनशैलीच्या परिणामस्वरूप आपल्या आहारामध्ये होत असलेले बदल या सर्वच गोष्टींमुळे सतत कुठल्या ना कुठल्या अलर्जीज्, अस्थमा यांसारखे विकार पाठीमागे लागतात. विशेषतः लहान मुलांमध्ये आता हे विकार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. हे विकार सुरु झाले की बहुतेक वेळी मुलांना अँटी बायोटिक्स दिली जात राहतात. काही वेळा तर मुलांची तब्येत इतकी खालावते, की नुसती अँटी बायोटिक्स न देता, स्टेरॉइड्स देखील द्यावी लागतात. या सर्व औषधांमुळे मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होत जाते. अश्या वेळी मुलांच्या आहारात काही वस्तूंचा समावेश केल्याने, या विकारांचे दुष्परिणाम, किंवा त्यांपासून होणारा त्रास टाळता येऊ शकतो.

यासाठी आपल्याला मुलांच्या आहारात असे पदार्थ समाविष्ट करावयास हवेत, ज्यांच्या सेवनाने मुलांचा, सततच्या अॅलर्जीज् पासून बचाव तर होईलच, शिवाय त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल. बदाम, साल्मन सारखे मासे, सोयाबीन तेलामध्ये असलेले पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स अॅलर्जीज पासून बचाव करण्यास मदत करतात. या पदार्थांच्या नियमित सेवनाने विशेषकरून अॅस्थमा सारख्या श्वसनरोगांपासून बचाव होऊ शकतो.

ज्या मुलांच्या शरीरामध्ये ओमेगा ३, व ओमेगा ६ ची पातळी जास्त असते, अश्या मुलांना श्वसनाचे विकार होण्याचा धोका कमी असतो. स्वीडनमधील कॅरोलीन्स्का इंस्टीट्युटच्या शोधकर्त्या एना बर्गस्त्रोम यांच्या म्हणण्यानुसार, मुलांमध्ये अॅलर्जीज उद्भविण्याची सुरुवात अगदी लहान वयापासूनच होत असते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे. त्यामुळे मासे, सोयाबीन, बदाम, अक्रोड इत्यादी पदार्थांचा समावेश आपल्या मुलांच्या आहारामध्ये जरूर करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही