माकडे वेटर असलेले जगातील सर्वात अजब रेस्टॉरंट


या जगामध्ये चित्रविचित्र गोष्टी नेहमीच आपल्या पाहण्यात किंवा वाचण्यात येत असतात. पण एका रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडे, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात ही कल्पनाच अविश्वसनीय वाटते. पण जपान या देशामध्ये असलेल्या या अनोख्या रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही गेलात, तर तुमच्या जेवणाची ऑर्डर घेण्याकरिता कोणी मनुष्य नव्हे, तर चक्क एक माकड येते, आणि तुमच्या जेवणाची ऑर्डर नोंदवून घेते. माकडे वेटर्स म्हणून काम करीत असलेले हे अजब रेस्टॉरंट टोकियोमध्ये असून, येथे काम करणाऱ्या माकडांना अतिशय उत्कृष्ट पद्धीतीने रेस्टॉरंटमध्ये काम करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे या रेस्टॉरंटमधील मिळणाऱ्या चविष्ट खाद्यपदार्थांपेक्षा सुद्धा येथील ‘ वेटर्स ‘, पर्यटकांच्या आणि स्थानिक जनतेच्या कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय बनून राहिले आहेत.

कायाबुकीया टॅव्हर्न नावाच्या या रेस्टॉरंटची ही खासियतच आहे. येथे काम करणाऱ्या दोन माकडांनी ‘कस्टमर सर्व्हिस’ चे रूपच पालटून टाकले आहे. जपान देशामध्ये जनावरांवर अत्याचार करणे, त्यांना कामाला जुंपणे, या विरुद्ध कडक कायदे अस्तित्वात आहेत. पण या रेस्टॉरंटचे मालक काओस ओत्सुका यांनी शासनाकडून, माकडांना वेटर्स म्हणून कामाला ठेवण्याची परवानगी मिळविली आहे. पण या परवानगीनुसार काओस ओत्सुका यांना या माकडांकडून दिवसातील दोनच तास काम करून घेण्याची सूट आहे.

या माकडांच्या ‘ वर्किंग अवर्स ‘ मध्ये ही माकडे वेटर्सचा गणवेश परिधान करतात. या दोघांची नावे ‘ चेन ‘ आणि ‘ फुफु ‘ अशी असून हे दोघे, रेस्टॉरंटमध्ये जेवण घेण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना मेन्यू कार्ड देतात. मग या पाहुण्यांची खाण्याची ऑर्डर नोंदवून घेऊन, ते वेटर्स पाहुण्यांना जेवण ‘ सर्व्ह ‘ देखील करतात. पाहुणे रेस्टॉरंटमध्ये येताच चेन त्यांना आदराने टेबलपर्यंत घेऊन जाऊन, त्यांना स्थानापन्न होण्यास सांगतो. त्यानंतर फुफु पाहुण्यांना हात पुसण्यासाठी गरम पाण्यामध्ये भिजविलेले टॉवेल आणून देतो. हे दोघे ग्राहकांना जेवण आणून देण्याव्यतिरिक्त ग्राहकांचे मनोरंजन देखील करतात. या दोन्ही वेटर्स मुळे टोकियोतील हे रेस्टॉरंट पर्यटकांसाठी आकर्षण ठरीत आहे.

Leave a Comment