आता लग्न सराईसाठी भाड्याने मिळणार शिवशाही बस


मुंबई – एसटी महामंडळाला होणाऱ्या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून विविध योजना सुरू करण्यात येत असून आता सर्वांना आकर्षण असलेली शिवशाही बस लग्न सराईसाठी प्रवाशांना भाड्याने मिळणार आहे. एसटी प्रशासनाने त्याबाबतचे एक परिपत्रक सर्व आगारांना पाठवले आहे.

लग्न समारंभ, साखरपुडा, बारसे अशा अनेक आनंददायी सोहळ्यामध्ये सन्मानाने मिरविण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली एसटीची ‘शिवशाही’ ही वातानुकुलित बस सज्ज झाली आहे. आता लग्न संमारंभासाठी परिवहन मंत्री रावते यांच्या निर्देशानुसार आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्य अशी संपूर्ण वातानुकूलित ‘शिवशाही’ बस ५४ रुपये प्रती किमी इतक्या माफक दरात प्रासंगिक करारावर देण्यात येणार आहे. त्यामुळे आता लग्नाला जाणाऱ्या वऱ्हींचा प्रवास हा गारेगार होणार आहे.

नुकताच यावर्षीचा लग्नाचा ‘सिझन’ सुरू झाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने कालपासून शिवशाही ही ४५ आसनी बस ५४ रुपये प्रति कि.मी. दराने प्रासंगिक करारावर देण्याचे ठरविले आहे. नुकतेच याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून, दिवसाला किमान ३५० कि.मी.चे भाडे भरून प्रचलित प्रासंगिक करार पद्धतीनुसार ही बस भाड्याने घेता येईल. याच बरोबर धार्मिक यात्रा, सहल व इतर कारणांसाठी समूहाने जाणाऱ्या लोकांसाठी हि बस प्रासंगिक करारावर उपलब्ध होणार असून सध्या ज्या आगाराकडे या बसेस उपलब्ध आहेत,त्या आगारात याबाबत अधिक चौकशी करून नोंदणी करता येईल.असे एसटीचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Comment