या गावात होत नाहीत बाळांचे जन्म


मध्यप्रदेशातील सांका जागीर या गावात बाळाचा जन्म होण्यास बंदी असून गेल्या कित्येक वर्षात येथे एकही बालक जन्माला आलेले नाही. भोपाळ पासून ७७ किमी असलेले हे गांव येथील प्राचीन श्याम मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. मात्र या श्माम भगवानाचा कोप होईल म्हणून येथे महिलांना बाळंत होता येत नाही. १२०० लोकवस्ती असलेल्या या गावात प्रामुख्याने गुर्जर समाजाची अधिक वस्ती आहे.

या गावात असा समज आहे की बाळ येथे जन्माला आले तर शाम मंदिर अपवित्र होईल व जन्मणारे बालक अपंग निपजेल अथवा त्याच्या कुटुंबावर अनेक संकटे येतील. यामुळे येथे महिलांची प्रसूतीची वेळ जवळ आली की त्यांना माहेरी पाठविले जाते, रूग्णालयात दाखल केले जाते किंवा गावाबाहेरील शेतावर झोपडी बांधून तेथे प्रसूती केली जाते. गावचे सरपंचपद ३५ वर्षे भूषविलेले मांगीलाल सांगतात त्यांच्या हयातीत या गावात एकही मूल जन्माला आलेले नाही. इतकेच नाही तर त्यांच्या आठी मुलांचे जन्म गावाबाहेर शेतात बांधलेल्या झोपडीत झाले आहेत.

नवे सरपंच व मांगीलाल यांचे पुत्र नरेंद्रसिंह यांनी मात्र ही वाईट प्रथा मोडायचा निर्धार केला असून त्यांना पंचायतीची साथ आहे. गावातील लोकांना ते हा सर्व अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे समजावत आहेत. ते म्हणतात, आपण श्यामजींची पूजा करतो मग ते आपले का वाईट करतील. आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. अर्थात गावकर्‍यांत पूर्ण जागृती होण्यासाठी कांही काळ जावा लागेल असेही त्यांना वाटते कारण शेवटी प्रश्न जन्माला येणार्‍या नव्या जीवाशी संबंधित आहे.

Leave a Comment