या मंदिरात कृष्णलल्लांनी खिडकीतून दिले भक्ताला दर्शन


कर्नाटकातील प्रसिद्ध श्रीकृष्ण मठ मंदिर देशातील अन्य श्रीकृष्ण मंदिरांपैक्षा वेगळे म्हणता येईल. या मंदिरात गेल्यानंतर आश्रमात आल्याचा भास होतोच पण येथील पवित्र वातावरण भक्तांना खूपच भावते. उडपीतील हे सर्वात प्राचीन मंदिर १५०० वर्षे जुने असून ते दगड व लाकूड यातून बनविले गेले आहे. मंदिराजवळ असलेल्या मोठ्या तलावात या मंदिराचे अतिशय सुंदर प्रतिबिंब उमटते.


मंदिरात विशाल मंडपातून आत प्रवेश केल्याबरोबर श्रीकृष्णाचे थेट दर्शन होत नाही. कोणत्याही मंदिरात गाभारा प्रवेश केला की दरवाजातून सर्वप्रथम भगवानाची प्रतिमा भाविकांना दिसते येथे मात्र त्याला अपवाद आहे. गर्भगृहात जाताच ९ खिडक्यांवर दशावताराचे दर्शन होते व मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्या खिडकीतून श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती दर्शन देते. मूर्तीचे दर्शन होताच मन प्रसन्न झाल्याचा अनुभव भाविकांना येतोच येतो. असे सांगतात की कृष्णभक्त कनकदास यांना या मंदिरात प्रवेश दिला गेला नव्हता तेव्हा त्यांनी कळवळून कृष्णलल्लाची प्रार्थना केली व दर्शन दे अशी विनवणी केली तेव्हा कृष्णाने प्रसन्न होऊन मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीतून कनकदासांना दर्शन दिले.


या मंदिरात सूर्यापासून हनुमानापर्यंत अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा असून या सर्व मूर्ती प्राचीन आहेत. मंदिर प्रांगणात विष्णुचे आसन नागराजाचेही मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १३ व्या शतकात वैष्णव संत श्री माधवाचार्य यांनी केल्याचे सांगितले जाते. मंदिरातील भितींवर कांही चित्रेही रेखाटली गेली असून तीही खूप जुनी आहेत.

Leave a Comment