शिवसेनेने श्रीनगरच्या लालचौकात करून दाखवलेच !


श्रीनगर : शिवसेनेने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिलेलं आव्हान पूर्ण करत काल दुपारी श्रीनगरच्या लाल चौकात अखेर तिरंगा फडकावून दाखवलाच. अर्थात स्थानिक पोलिसांनी काही वेळातच तिरंगा फडकवणाऱ्या ९ शिवसैनिकांना ताब्यात घेतले आणि नंतर थोड्यावेळाने सोडूनही दिले.

फारुख अब्दुल्ला यांनी २७ नोव्हेंबर रोजी आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा, असे आव्हान दिले होते. तुम्ही साधे लाल चौकात तिरंगा फडकावू शकत नाहीत आणि पाकव्याप्त काश्मिर मिळवण्याच्या गप्पा मारता, असे अब्दुल्ला यांनी म्हटले होते. शिवसेनेने तात्काळ फारुख अब्दुलांचे आव्हान स्वीकारत श्रीनगरच्या लालचौकात तिरंगा फडकावून घोषणाबाजीही केली. हे सर्व शिवसैनिक जम्मूचे रहिवासी आहेत. शिवसेनेचे जम्मू प्रदेशाध्यक्ष डिम्पी कोहली आणि सरचिटणीस मनीष साहनी यांनी यापूर्वी शिवसेना लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याची माहिती दिली होती.