दिल्लीतील जामा मशीद पूर्वीचे जमुनादेवी मंदिर – विनय कटियार


नवी दिल्ली – देशातील राजकीय आणि सामाजिक स्थिती बाबरी मशीद आणि रामजन्मभूमीमुळे ढवळून निघत असतानाच आता भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील जामा मशीद पूर्वीचे जमुनादेवी मंदिर आहे, असा दावा केला आहे.

भाजपचे नेते विनय कटियार एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, हिंदूंच्या सुमारे ६ हजार जागा मुगल सम्राटांनी उद्ध्वस्त केल्या होत्या. जामा मशीद मूळतः जमुनादेवीचे मंदिर होते, तसेच ताजमहालच्या जागी तजो महलही होता. आमच्या अनेक धार्मिक स्थळांना मुस्लिमांनी लक्ष्य केले होते. पण रामजन्मभूमी, काशीमधील बाबा विश्वनाथ मंदिर आणि मथुरा येथील कृष्णा जन्मभूमी यावर आम्ही आमचा हक्क सांगत आहोत. आम्ही आत्ता फक्त राम मंदिर उभारू इच्छितो, असे कटियार यांनी सांगितले.

कटियार यांनी अयोध्येच्या जागेवरून काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्यावरही टीका केली आहे. सिब्बल सुन्नी वक्फ बोर्डाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात खटला लढवत आहेत. त्या ठिकाणी काँग्रेस मशीद उभारू इच्छित आहे. पण त्यांना आम्ही तसे करू देणार नाही. जर काँग्रेसने मशीद बांधण्याच्या प्रयत्नांचा पाठपुरावा केला तर आम्ही उद्ध्वस्त केलेल्या इतर ६ हजार धार्मिक ठिकाणी मोर्चा वळवू, असे कटियार यांनी सांगितले.