देशी गाईच्या शेण-गोमूत्रापासून बनलेल्या उत्पादनांना सरकार करणार मदत


देशी गाईच्या गोबर व गोमूत्रापासून बनलेल्या उत्पादनांना सरकार मदत करणार असून हे उत्पादन करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहनही देणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट करण्याचे लक्ष्य गाठण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात येत आहे.

केंद्रीय कृषि राज्यमंत्री कृष्णा राज यांनी या संदर्भात एक बैठक आयोजित केली होती. त्यात ही माहिती देण्यात आली. या बैठकीला विविध मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोबर आणि गोमूत्रापासून होणाऱ्या विविध उत्पादनांची आयुष मंत्रालयाने निश्चिती केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

गाईच्या शेणापासून प्राकृतिक कीटकनाशक, खत तसेच गोबर गॅसच्या निर्मितीशिवाय शेणाच्या विटा, घरात वापर होणारे मॅट आणि एअर प्युरिफायर तयार होऊ शकतात. याशिवाय गोमूत्रापासून साबण तसेच फेसवॉश यांसारखे फेशियल आणि अन्य सौंदर्य उत्पादने बनविण्यावरही यावेळी विचार करण्यात आला. या संदर्भात लवकरात लवकर अहवाल देण्यास आयुष मंत्रालयाला सांगण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

या उत्पादनांची निश्चिती झाल्यानंतर छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यानंतर या उद्योगांना लघु व मध्यम मंत्रालयाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्यात येईल.