कायदेशीर कारवाई थांबविण्यासाठी फोर्टिस हॉस्पिटलची २५ लाखांची ऑफर


गुडगाव- फोर्टिस हॉस्पिटलने काही दिवसापूर्वी डेंग्यूच्या उपचारासाठी दाखल सात वर्षाच्या मुलीच्या पालकांच्या हातात तब्बल १६ लाखांचे बिल दिल्याचे वृत्त आपण वाचलेच असेल. डेंग्यूचे उपचार करूनही तसेच पूर्ण बिल भरुनही सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात नवे वळण आले असून हॉस्पिटल प्रशासनाने कायदेशीर कारवाई रोखण्यासाठी २५ लाखांची लाच दिल्याचा दावा मुलीचे वडील जयंत सिंह यांनी केला आहे. फोर्टिस हॉस्पिटल मुलीच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा आणि आपल्या चुका लपवण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले जात आहे.

मला फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी भेटले आणि १० लाख ३७ हजार ८८९ रुपयांचा चेक घेण्याची ऑफर दिल्याचेही आद्याच्या वडिलांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांनी २५ लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही जयंत सिंह यांनी केला आहे. त्यांनी हे पैसे घेतल्यानंतर कायदेशीर करार करण्यास सांगितले. या प्रकरणातील कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर जाहीर करायची नाही, तसंच हे प्रकरण न्यायालयात घेऊन जायचे नाही, अशा अटी या करारात घातल्याचे जयंत सिंह म्हणाले आहेत.