कॉलेजमध्ये परत येऊन या जोडप्याने केले लग्न!


ज्या ठिकाणी आपण प्रेमात पडलो, त्याच ठिकाणी लग्न करण्याचा निश्चय केरळमधील एका जोडप्याने पूर्ण केला.आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या या दोघांनी कोणत्याही प्रकारचे धार्मिक कर्मकांड न करता आपल्या महाविद्यालयातच लग्नगाठ बांधली.

अमर नाथ (24 वर्षे) आणि सफना (23 वर्षे) अशी या जोडप्याची नावे आहेत. दोघांचेही धर्म वेगळे असल्याने त्यांना कोणतेही कर्मकांड करायचे नव्हते. एर्नाकुलममधील महाराजा महाविद्यालयात हे दोघे शिकत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे स्थान सर्वात महत्त्वाचे होते.

त्यामुळे त्यांनी विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्नाची नोंदणी केली आणि दोन दिवसांनी, 2 डिसेंबर रोजी, त्यांनी महाविद्यालयात येऊन एकमेकांना लग्नाच्या माळा घातल्या. “आम्हाला फक्त आमच्या बॅचमेट्स व कुटुंबीयांसोबत कॉलेजमध्ये येऊन वेळ घालवायचा होता. मात्र मी तिच्या गळ्यात चेन बांधावी, हा सफनाचा आग्रह होता. आम्ही एक चेन खरेदी करण्यासाठी एका ज्वेलरीच्या दुकानात गेलो,” असे अमरनाथने एका स्थानिक वृत्तपत्राला सांगितले.

सफना ही मुस्लिम असून ती कोच्ची येथे राहते, तर अमरनाथ हा एर्नाकुलम जिल्ह्यातील चोट्टनिक्कारा येथील आहे.

Web Title: Come back to college and marry this couple!