मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आकडेवारी


मुंबई – राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९ हजार ५३७ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १६ लाख ९८ हजार ११० शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी ५ हजार ५८० कोटी रुपये मंजूर केले असून त्याचबरोबर वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत ६ लाख ५ हजार ५०५ शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी ४ हजार ६७३ कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे आजपर्यंत एकूण सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी १४ हजार ८६४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, वन टाईम सेटलमेंटच्या ४ हजार ६७३ कोटी रुपयांसह एकूण १९ हजार ५३७ कोटी रुपये मंजूर केले आहेत.


ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून मागविल्यानंतर एकूण ७७ लाख खातेधारक असून, पुन्हा आलेले अर्ज तसेच इतर त्रुटी दूर करून सुमारे ६९ लाख अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. ही प्रक्रिया शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत अशीच सुरू राहणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.