३१ मार्च पर्यंत वाढविणार आधारकार्ड जोडणीची मुदत


नवी दिल्ली – ३१ मार्च २०१८ पर्यंत बँक खाते आणि विविध सरकारी योजनांसाठी आधारकार्ड जोडणीची मुदत वाढविण्यात येणार आहे. यापूर्वी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. पण ही मुदत आता वाढविण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे मुदत वाढवण्यासंबंधी आज अधिसूचना काढण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आली होती. गुरुवारी त्यावर सुनावणी झाली. सरकारने सुनावणीवेळी दिलेल्या माहितीनुसार, आधार जोडणीची मुदत वाढवण्यात येणार असून, आधार कार्ड सक्तीचे करण्याबाबतचा निर्णय मागे घेता येणार नसल्याचे यात म्हटले आहे. केंद्र सरकार यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले.