रशियाने बनविला होता जगातला सर्वात मोठा अॅटमबाँब


दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानवर अणुबाँब टाकून त्यांचे वर्चस्व सिद्ध केल्यानंतर अमेरिका व रशिया या दोन महासत्तात सुरू झालेल्या शीतयुद्धाचा परिणाम रशियाने जगातील सर्वात मोठा अणुबाँब बनविण्यात झाले होते याची आज अनेकांना आठवण नसेल. अर्थात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सुरू असलेल्या चुरशीतून हा बाँब बनविला गेला होता मात्र तो इतका मोठा होता की त्याचा वापर सुलभतेने व सहजपणे करता येणेच अशक्य बनले होते.

साधारण साठच्या दशकात पराकोटीला पोहोचलेल्या रशिया अमेरिका शीत युद्धात प्रचंड प्रमाणावर शस्त्रास्त्र निर्मिती केली जात होती. रशियाच्या आंद्रेई सखारोव्ह या वैज्ञानिकाने इतका मोठा अणुबाँब तयार केला की तो वाहून नेण्यासाठी खास लढाऊ विमान तयार करावे लागले. जगातील सर्वात मोठ्या या अणुबाँबचे नामकरण झार असे केले गेले होते. झार ही रशियाच्या राजांची उपाधी होती. सर्वसाधारणपणे अशी हत्यारे विमानातून वाहून नेली जातात मात्र हा बाँब इतका मोठा होता की तो विमानाबाहेर पॅराशूटच्या सहाय्याने लटकविला गेला होता. त्यासाठी तुपोलोव्ह ९५ या लढाऊ विमानाचे डिझाईन बदलले गेले.

या बाँबचे परिक्षण केले गेले ते नावाया जेमलिया बेटावर. हा बाँब ८ मीटर लांब, २१६ मीटर रूंद व २७ टन वजनाचा होता. याची चाचणी यशस्वी झाली पण त्यामुळे ४० मैल उंचीचा लोळ उठला तसेच हा लोळ १ हजार किमीवरूनही पाहता आला. स्फोट केलेले बेट संपूर्ण नामशेष झालेच पण ५० मैल परिसरातील घरेही नष्ट झाली. अर्थात बाँब बनविणार्‍या आंद्रेईने रशियासाठी हा स्फोट घातक ठरू शकेल या शंकेने या बाँबमधील स्फोटकांची क्षमता कमी केली होती तरीही इतके नुकसान झाले होते. या नंतर रशियाचा जगभरातून धिक्कार केला गेला व खुल्या हवेत अणुबाँब चाचण्या घेण्यास बंदी केली गेली. वैज्ञानिक आंद्रेई यांनाही नंतर उपरती झाली व त्यांनी अण्वस्त्र विरोधी भूमिका घेतली व शांततेसाठी काम केले. त्याचमुळे १९७५चा शांतता नोबेल पुरस्कार त्यांना दिला गेला.

Leave a Comment