सोलर क्षेत्रात पतंजलीचे पदार्पण- चीनला थेट आव्हान


मल्टी नॅशनल कंपन्यांच्या नाकात दम आणल्यानंतर योगगुरू रामदेवबाबांच्या आशीर्वादाने चालविण्यात येत असलेला पतंजली उद्योगसमूह आता सौर क्षेत्रात पदार्पणासाठी सिद्ध झाला आहे. या क्षेत्रात पतंजली सौर उपकरणांचे उत्पादन करणार असून सध्या या क्षेत्रात बलाढ्य असलेल्या चीनला थेट आव्हान निर्माण करणार आहे. सौर क्षेत्राची भारतात सध्या वेगाने वाढ होत आहे व यात चीनमधून आयात होत असलेल्या उपकरणांचा मोठाच दबदबा आहे.

पतंजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण या संदर्भात एक मुलाखत देताना म्हणाले, स्वदेशी आंदोलनात आम्ही सौर क्षेत्रालाही समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाला वीज मिळायला हवी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रेटर नॉयडा भागात सौर उपकरण उत्पादनांचा कारखाना सुरू केला जात असून या क्षेत्रात पतंजली सुरवातीला १०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. पतंजलीने नेव्हिगेशन क्षेत्रातील अ्रॅडव्हान्स नेव्हिगेशन अॅन्ड सोलर टेक्नॉलॉजी या कंपनीचे अधिग्रहण नुकतेच केले आहे. सध्या या कंपनीची वीज उत्पादन क्षमता १२० मेगावॉट आहे.

सरकारने २०२२ पर्यंत म्हणजे येत्या पाच वर्षात सौर उर्जा निर्मितीचे प्रमाण ६० जीवॉटवरून १७५ जीवॉटवर नेण्याचे ध्येय ठेवले आहे. सध्या सौर उर्जेसाठी वापरली जाणारी उपकरणे मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केली जात आहेत व त्यातील कांही मॉड्यूल खराब असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर येत आहेत असे समजते. त्या पार्श्वभूमीवर पतंजलीचा या क्षेत्रातील प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

Leave a Comment