ट्रक तोलून धरणारा हा ‘शक्तिमान’ पाहिला का?


पुलावरून खाली कोसळणाऱ्या व्हॅनची मागची चाके तोलून धरणाऱ्या लंडनमधील एका पोलिस अधिकाऱ्याची छायाचित्रे व व्हिडियो व्हायरल झाली आहेत. या अधिकाऱ्याने 15 मिनिटे ही गाडी हातानी धरून ठेवली

मार्टिन विलिस असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. वेस्ट यॉर्कशायर येथे हा अधिकारी काम करतो. त्याच्या या पराक्रमामुळे एक गाडी तर कोसळण्यापासून वाचलीच, पण त्यातील चालकाचा जीवही वाचला. त्याच्या या बहादुरीबद्दल इंटरनेटवर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विलिस याला एका व्हॅनचा अपघात झाल्याचा फोन आला होता. तेव्हा तो ए1 नावाच्या महामार्गावर पोचला. तिथे त्याला ही व्हॅन पलटी होऊन पुलावरून लोंबकळताना दिसली. वाऱ्याच्या वेगाने ही व्हॅन झोके खात होती आणि चालक तीत अडकून पडला होता.
विलिसने आपल्या सहकाऱ्यांना महामार्गाची नाकेबंदी करण्याचा इशारा दिला आणि व्हॅनची मागची चाके धरून ठेवली.

अशा प्रकारे त्याने 15 मिनिटांपर्यंत ती गाडी धरून ठेवली आणि नंतर रेस्क्यू व्हॅन आल्यावर व्हॅनला पुलावर ओढण्यात आले. त्यासाठी तब्बल 2 तास लागले.